बुलढाणा : लाच घेणे देणे यामध्ये आता नावीन्य उरले नाही. कोणतेही काम आपल्याला पाहिजे तसे करून घेण्यासाठी लाच देण्यासाठी काही मंडळी तयार राहते आणि घेणारे पण तत्पर राहतात. यामुळे लाचखोरांना देखील लाच घेण्याची काही लाज लज्जा उरली नसून त्यांचे मनोधैर्य कमालीचे वाढले आहे. त्यांनी लाच खाऊ वृत्तीचा कळस गाठलाय.बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका कारवाईत याचा प्रत्यय आला. एका महाभागाने चक्क मेहकर न्यायालयात लाखाची लाच स्वीकारण्याचे असामान्य धाडस केलंय!

अर्थात लाचखोरीचा कळस गाठणाऱ्या या महाभागाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामुळे बुलढाणा, वाशीम जिल्ह्याच्या विधी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र चक्क न्यायालयात एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची ही घटना काहीशी दुर्मिळ असल्याने राज्यातील विधी क्षेत्रातही या घटनेने खळबळ उडणार आणि त्याची गंभीर दखल घेतली जाणार हे नक्कीच.

मेहकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. एका सहायक सरकारी वकिलाला लाच घेतांना पकडले आहे. जनार्दन मनोहर बोदडे (६१, रा. संभाजी नगर मेहकर, जि. बुलढाणा ) असे एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे. हे महाशय मुळचे सावजी ले आऊट,खामगाव, जिल्हा बुलढाणा चे रहिवासी आहेत.

मागितले तीन, घेतले एक लाख

तक्रारदार याने डोणगाव (ता. मेहकर) पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिली होती. त्यातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात जोरदार बाजू मांडण्यासाठी बोदडे याने तक्रारदार कडे तीन लाखाची मागणी केली होती. शेवटी मोठे मन दाखवून त्याने अडीच लाखात तडजोड केली. याचा पहिला हफ्ता म्हणजे एक लाख रुपये स्वीकारताना त्याला आज शुक्रवारी पकडण्यात आले. त्याचे विरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर अधिक्षक सचिन शिंदे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, हवालदार विनोद मारकंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, रवींद्र घरत, मिलिंद चन्नकेशला यांनी ही कारवाई केली.

Story img Loader