बुलढाणा : अयोध्या मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आनंदात गर्क असलेला बुलढाणा जिल्हा महिलेच्या निर्घृण हत्येने हादरला! वडनेर भोलजी शिवारात घडलेल्या या घटनेने नांदुरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गंगाबाई नितीन कळसकार (३५, वडनेर भोलजी, तालुका नांदुरा) असे मृत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा – नागपूर : जमीन विकण्यासाठी चक्क जिल्हा न्यायालयाची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण…
हेही वाचा – दिल्लीकडून विदर्भाचा दारूण पराभव, महिला क्रिकेट संघ केवळ २८ धावात गारद
वडनेर भोलजी शिवार भाग १ गट क्रमांक ६४ मधील नरेंद्र कळसकार यांच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. हातावर चाकूने वार करून डोक्यात दगड घालून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान तिचा पती नितीन एकनाथ कळसकार याने याची माहिती वडनेर भोलजी पोलीस चौकीला दिली. हवालदार ज्ञानेश्वर धामाडे यांनी नांदुरा पोलिसांना कळल्यावर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नितीन कळसकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगाबाई बटाईने घेतलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहे.