बुलढाणा : एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आकाशातील सूर्य आग ओकू लागला आहे. जिल्ह्यात नुसताच सूर्य आग ओकू लागला, असे नव्हे तर पाणी सुद्धा पेटल्याचे भीषण चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल दीड लाखावर ग्रामस्थांची तहान टँकर आणि खासगी अधिग्रहित विहिरीद्वारे भागविली जात आहे. यामुळे ग्रामीण रहिवाशांचे बेहाल होत असून त्यांच्यावर कोसोदूर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला, त्यातच अवकाळी पण बरसला. या ऊप्परही पाणी टंचाईने फेब्रुवारी मध्येच डोके वर काढले. मार्च अखेर पाणी टंचाईची तीव्रता वाढली. एप्रिल मध्यावर पाणी पेटल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात ३१ टँकर सुरु असून २६ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृहक्षेत्रातील मेहकर मधील सात गावांना सात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील चार गावात आठ, चिखलीत सात गावांना सात, सिंदखेड राजात तीन गावांना चार तर बुलढाणा तालुक्यात पाच गावांना पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाच तालुक्यातील या २६ गावांची लोकसंख्या ६१हजार ५९० इतकी आहे. यामुळे एकशष्ट हजारावर ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी टँकर वर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे कमिधिक एक लाख नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी अधिग्रहित खाजगी विहिरीचा आधार आहे. तब्बल ८ तालुक्यातील १४५ गावासाठी १६६ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात ४६ गावांसाठी ४६, देऊळगाव राजा मधील २० गावासाठी ३३, चिखलीत २९ गावासाठी २९, सिंदखेड राजात २८ गावासाठी ३४, बुलढाणा २० गावासाठी ३३, लोणार ८ गावासाठी १० खाजगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेगाव व मलकापूर मिळून ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यातच तीन तालुक्यातून २१ प्रस्ताव आल्याने विहिरीची संख्या वाढणार हे उघड आहे.

२०९ योजनाना मंजुरी

यंदाच्या उन्हाळ्यासाठी १६ कोटी ९६ लाख रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात १३३४ उपाय योजनाचा समावेश आहे. आज अखेर यातील २०९ योजनाना मंजुरी मिळाली आहे.

अंढेरामध्ये चार टँकर

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा हे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे. गावातील ८७०० रहिवासीयांचे पाण्यासाठी बेहाल होत आहे. यामुळे मागील तेरा मार्च ला तिथे ३टँकर सुरु करण्यात आले. मात्र ते अपुरे ठरल्याने १० एप्रिल पासून एक टँकर वाढविण्यात आला आहे. बिकट स्थिती पाहता तिथे खाजगी विहिरी सुद्धा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्या नुकत्याच रद्ध करण्यात आल्या आहे.