बुलढाणा : मागील मार्च महिन्यापासून नफ्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाने मे महिन्यात विक्रमी नफा मिळविला आहे. तसेच ‘रेकॉर्ड ब्रेक’ वाहतूक करून भरीव उत्पन्नाचा आकडा गाठला आहे. विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ आगारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही जबरदस्त कामगिरी बजावली आहे. मार्च २०२३ पासून नफ्यात असलेल्या बुलढाणा विभागाचा नफ्याचा चढता आलेख कायम आहे. मार्च महिन्यात ७१.३९ लाख, एप्रिल मध्ये १.४४ कोटीचा नफा मिळाला. मे महिन्यात नफ्याचा हा आकडा तब्बल २ कोटी ३लाख ८२ हजार वर गेला. यामुळे जून मध्येही ही कौतुकास्पद कामगिरी कामगिरी कायम राहण्याची चिन्हे आहे.
चालक-वाहकांची कमाल
दरम्यान अपुऱ्या संख्येतील बस, जुनाट गाडया, नादुरुस्तीचे प्रमाण, विक्रमी तापमान या अडचणींवर मात करत प्रामुख्याने चालक, वाहक यांनी या कामगिरीत सिंहाचा वाटा उचलला आहे. मे महिन्यात उपलब्ध ४२८ बसद्वारे ४४लाख ९३ हजार किलोमीटर अंतर कापून त्यांनी प्रवासी वाहतूक केली आहे. यातून २६ ६३ ८९ यातील २४ ३२ ९७ खर्च वजा जाता विभागाला २ कोटी ३ लाखांचा नफा झाला आहे.
बुलढाणा आगार अव्वल
दरम्यान ७ आगारात बुलढाणा आगार ५१.१९ लाख नफ्यासह अव्वल ठरला आहे. मेहकर ४८. ४६, शेगाव ४५ लाख, चिखली १४.५३, मलकापूर २६.७४, जळगाव जामोद २८.२० लाख नफा असा अन्य आगारांची कामगिरी आहे.