बुलढाणा : विविध राजकीय चर्चा, वादंग यांच्यासाठी कारणीभूत ठरणारे ‘एक्झिट पोल’ एकदाचे जाहीर झाले. आता उद्या ४ जूनला ‘एक्झाट पोल’ अर्थात मतमोजणी होणार आहे. या मोजणीची आणि निकालाची उत्कंठा आता गगनाला भिडली आहे. बुलढाण्यातील लढतीत उमेदवारच नव्हे तर अप्रत्यक्षपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीचे प्रतापराव जाधव विक्रमी विजय साकारतात की त्यांना पराभूत करून आघाडीचे नरेंद्र खेडेकर ‘जायंट किलर’ ठरतात? याचा फैसला मंगळवारी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणाची दशा अन् दिशा बदलण्याची क्षमता असलेल्या या निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बुलढाण्यात ‘खरी शिवसेना कुणाची’ याचाही फैसला होणार असल्याने ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’ बंगल्याचेही निकालाकडे लक्ष राहणार आहे. या दोघा नेत्यांनी बुलढाण्यात मागील एका वर्षांपासून वैयक्तिकरित्या लक्ष घातले. दोघांनी निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात दौरे करीत सभा घेतल्या. प्रत्यक्ष निवडणुकीतही ते जिल्ह्यात आले. मुख्यमंत्री शिंदे तर १४ एप्रिलला भीम जयंतीच्या धामधुमीत बुलढाण्यात केवळ प्रचार आढावा घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या दोघा नेत्यांच्या उपस्थितीतच जाधव आणि खेडेकर यांच्या एकाच गावात (खांमगावात) आणि एकाच मैदानात जंगी सांगता सभा पार पडल्या. ठाकरे यांनी बुलढाणा हवाच, असा आग्रह धरला तर एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाला जागा सुटणे आणि जाधव यांच्या उमेदवारीसाठी आपली प्रतिष्ठा अगदी दिल्लीपर्यंत पणाला लावली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज म्हणजे दबावाची यशस्वी राजकीय खेळी ठरली. सकाळी त्यांनी अर्ज भरला अन संध्याकाळी जाधव यांचे युतीचे तिकीट पक्के झाले, हा फक्त योगायोग नक्कीच नव्हता.

हेही वाचा – “…तर राजकारणातून संन्यास घेणार,” विजय वडेट्टीवार यांची घोषणा

जाधव यांची प्रतिष्ठा अन् खेडेकराचे भवितव्य

२००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बाजी मारून खासदार जाधव जिल्ह्याचे मोठे नेते झाले. मात्र चौथी लढत त्यांच्यासाठी निर्णायक आणि भावी राजकारणाची दिशा ठरविणारी ठरली. ‘अँटी इन्कबन्सी’, बंडखोरीमुळे लागलेला डाग, मतदारांची व्यापक नाराजी, भाजपाची दावेदारी, वंचितचा कमकुवत उमेदवार, यामुळे यंदाची लढत त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरली. मात्र, अनुभव, नियोजन, अचूक व्यूहरचना या त्रिसूत्रीने त्यांनी यावर मात केली. यामुळे ते विजयाच्या शर्यतीत खंबीरपणे टिकून राहिले. यंदाचा विजय त्यांना आणखी मोठा करणारा आणि ‘दिल्लीत मोठी संधी’ देणारा ठरणार आहे. तसेच जिल्ह्यातील शिंदे गटावर त्यांचेच प्रभुत्व कायम ठेवणारा राहील. पराभव त्यांच्या राजकारणाची मोठी हानी ठरणार आहे. आजपावेतो जिल्हा परिषद पुरतेच मर्यादीत असलेले खेडेकर यांना संभाव्य विजय खूप मोठा करणारा ठरणार हे उघड आहे. जाधवांसारख्या प्रबळ नेत्याला पराभूत केल्यास ते ‘जायंट किलर’ ठरतील. पण दुर्दैवाने पराभूत झाले तर त्यांचे राजकारण धोक्यात येईल. याच धर्तीवर या निवडणुकीतून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके यांचे राजकीय भवितव्य ठरविणारा हा निकाल आहे. त्यांनी सन्मानजनक मते मिळविणे त्याच्या भावी राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे. वंचितने आपला जनाधार किती गमावला हेही निकालातून कळणार आहे.

…तर सहा आमदार नापास!

ही निवडणूक काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा लढतीची रंगीत तालीम व सत्ताधारी पक्षाच्या सहा आमदारांची देखील अग्निपरीक्षा ठरली. भाजपाचे संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले (भाजप) , संजय रायमूलकर, संजय गायकवाड (शिंदेंसेना) आणि राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी अजितदादा गट) यांना जाधव यांना मताधिक्य देणे क्रमप्राप्त ठरले. यात अयशस्वी ठरलेल्या आमदाराना उमेदवारीमध्ये अडचण होऊ शकते. जाधव पराभूत होणे म्हणजे सहा सत्ताधारी आमदार नापास असा त्याचा अर्थ आहे.

निकालावर जिल्ह्याचे भावी राजकारण अवलंबून

उद्याच्या निकालावर जिल्ह्याचे भावी राजकारण अवलंबून असेल. खासदार जाधव जिंकले तर युतीचा जिल्ह्यातील दबदबा, वर्चस्व कायम राहणार हे उघड आहे. याचा अप्रत्यक्ष लाभ विधानसभा लढतीत होईल. मात्र ते पराभूत झाले तर जिल्ह्यात आघाडीची ताकद वाढणार आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि ठाकरे सेनेला उभारी व राजकीय आत्मविश्वास मिळणार आहे. वंचित आघाडी सोबत नसताना देखील मिळणारा विजय आघाडीसाठी मोठा बूस्टर ठरणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त, प्रतिभा धानोरकर यांचा दावा

….आणि मतमोजणी

उद्या चार वाजताच्या सुमारास मलकापूर मार्गावरील आयटीआय परिसरात व मार्गाने उधळण्यात येणारा गुलाल कोणाचा, याकडे लाखो मतदारांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सहा विधानसभेच्या १४ याप्रमाणे ८४ टेबलवर मतदानाची मोजणी होणार आहे. दोन निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १६०० कर्मचारी ही मोजणी करणार आहे. २३ ते २५ फेऱ्या झाल्यावर अंतिम निकाल हाती येतील. यात कोण विजयी होतो आणि कुणाचा ‘निकाल’ लागतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.