बुलढाणा : प्रारंभीपासून वादग्रस्त ठरलेल्या प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाच्या विरोधात शेतकरी एकवटले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा मार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी विविध टप्प्यात जहाल आंदोलन करीत आहे. आज बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी भक्तिमार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात प्रतिकात्मककरण्यात आले.
चिखली तालुक्यातील पेठ नजीकच्या पैनगंगा नदी पात्रात हे आंदोलन करण्यात आले. या लक्षवेधी आंदोलनात प्रामुख्याने चिखली तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. आज बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि शेतकरी पैनगंगा नदीत उतरले . भक्तिमार्ग रद्द चा निर्णय होत नाही, तोपर्यंत नदीतून बाहेर येणार नाही असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा…पटोले म्हणतात,‘महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीदासाठी
त्यामुळे पेठ गावासह चिखली तालुक्यात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी आंदोलन सुरू करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळही हादरले आहे. नागरिक, संघटना, नेते वा राजकीय पक्षांची मागणी नसताना मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संत नगरी शेगाव दरम्यान हा मार्ग बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. सिंदखेडराजा ते शेगाव जाण्यासाठी चांगल्या स्थितीतील किमान तीन मार्ग असतानाही शासनाचा अट्टाहास कायम आहे.
याला विरोध करण्यासाठी
भक्तिमार्ग विरोधी कृती समिती गठीत करण्यात आली आहे. शासकीय निर्णय जारी झाल्यापासून भक्ती महामार्ग विरोधी कृती समितीने विविध टप्प्यात आंदोलने केली आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात मागील होळी सणाला शासकीय निर्णयाची जाहीर होळी करण्यात आली होती. त्यानंतर चिखली, देऊळगाव राजा तालुक्यात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले होते. अलीकडे मागील ६ ऑगस्टला चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकरी पुत्रांनी टॉवर वर चढून आक्रमक आंदोलन केले होते.
हेही वाचा…‘एमपीएससी’मध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा वाद; परीक्षा, निकालावर काय परिणाम होणार?
त्याचवेळी मागण्या मान्य न झाल्यास आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज,१४ ऑगस्टला भक्ती महामार्ग पिडीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेकडो शेतकरी पेठ जवळील पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन घेण्यासाठी उतरले . जोपर्यंत भक्ती महामार्ग रद्द करण्याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आक्रमक आंदोलकांनी घेतली आहे.
हेही वाचा…चौघांचा बळी घेणारा ‘तो’ अखेर पश्चिम बंगालमधून ताब्यात; वर्धा पोलिसांनी…
अधिकारी आंदोलनस्थळी
दरम्यान सकाळी अकरा वाजे पासून सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनाची प्रशासनाने अखेर दखल घेतली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास चिखली तहसिल कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी पेठ गावात दाखल होऊन आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. आंदोलक आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत आंदोलक आणि महसूल अधिकारी यांच्यामधील ‘ऑन स्पॉट’ वाटाघाटी सुरूच होत्या.
© The Indian Express (P) Ltd