बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील उद्योग नगरी आणि व्यवसाय केंद्र असलेल्या खामगावमधील एका कृषी केंद्राला पेट्रोल टाकून आग लावून दिल्याची घटना घडली. हा अज्ञात आरोपी आणि आग लावण्याचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे व्यावसायिकांसह खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
यावर कळस म्हणजे हे कृषी केंद्र बियाणे, कीटकनाशके व खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय उर्फ मुन्ना पुरवार यांचे आहे. यामुळे ही ‘आग’ चांगलीच पेटण्याची चिन्हे आहे. मुन्ना पुरवार यांचे बाजारपेठ असलेल्या सरकी लाईन भागात ओम साई अँग्रो नावाने कृषी साहित्य विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी ( दिनांक १८) मध्यरात्री नंतर दुकान परिसरात अज्ञात व्यक्ती आली. त्या बहाद्धराने त्याच्या जवळच्या कॅनमधील पेट्रोल ‘शटर’ खालून आणि समोरच्या भागात ओतले. यानंतर कॅन बाजूला ठेवून खिश्यातील माचीस काढून पेट्रोलवर भिरकावली. यामुळे क्षणार्धात आगीने भडका घेतला. पाहता पाहता ही आग चांगलीच पसरली. यामुळे दुकानातील सोयाबीन बियाण्यांच्या बॅग व कृषी साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा सारा थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
हेही वाचा – सोन्याच्या दरात वारंवार बदल, ‘हे’ आहेत आजचे दर
‘त्याच्या’मुळे टळला अनर्थ
दरम्यान नेमके याच वेळी आग लागलेल्या ओम साई ऍग्रो केंद्रासमोरून जाणाऱ्या एका दक्ष नागरिकामुळे संभाव्य भीषण अनर्थ टळला. या जागृत नागरिकाला दुकान पेटलेले दिसल्याने त्याने प्रसंगावधान दाखवत पुरवार यांना फोन करून आगीची माहिती दिली. यामुळे पूरवार कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्या तसेच इतर कृषी साहित्य देखील जळून खाक झाले.
दरम्यान, याबाबत पुरवार यांनी रात्रीच शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४३६,४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच शहर पोलिसांनी सरकी लाईनमधील ओम साई ऍग्रो दुकान व परिसराची पाहणी करून पंचनामा केला आहे. दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. त्यात एक २५ ते ३० वयोगटातील युवक पेट्रोल टाकून दुकान पेटवताना दिसून येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील उद्योग नगरी आणि व्यवसाय केंद्र असलेल्या खामगाव मधील एका कृषी केंद्राला पेट्रोल टाकून आग लावून दिल्याची घटना घडली. हा अज्ञात आरोपी आणि आग लावण्याचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे व्यावसायिकांसह खामगाव शहरात खळबळ उडाली आहे. pic.twitter.com/0qSCHyUYXh
— LoksattaLive (@LoksattaLive) June 19, 2024
दरम्यान, या आगीमुळे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या खामगाव शहरात विविध शंका कुशंका, तर्क वितर्क यांना उत आला आहे. ही आग जुन्या भांडणातून लावण्यात आली का, याला काही वेगळीच पार्श्वभूमी आहे असे प्रश्न उपस्थित झाले आहे. ‘फुटेज’ युवक ज्या पद्धतीने आणि थंड डोक्याने आग लावली त्यावरून तो सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा खामगाव शहरातील नागरिकात होत आहे. त्यामुळे खामगाव शहर पोलिसांसमोर तातडीने तपास करण्याचे कडवे आव्हान उभे ठाकल्याची चर्चा देखील रंगली आहे.