बुलढाणा : तब्बल पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट मादीला बुलढाणा वन विभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने अथक परिश्रम करून संकट मुक्त केले! तिला पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले आहे. या बिबट मादीला वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात काल मंगळवारी रात्री उशिरा सोडण्यात आले. वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी आज बुधवारी, २६ फेब्रुवारीला दुपारी दिली आहे. काल पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी मोताळा वन परीक्षेत्रातील रोहीणखेड वर्तुळ (sarkal) मधील मौजे रोहीणखेड शिवारातील गट क्रमांक चारशे सत्तावीस मधील शेख आसीफ शेख कालु यांच्या मालकीच्या शेतातील ५० फुट खोल विहिरीत एक बिबट पडल्याचे दिसून आले.
पाण्यात बुडण्याच्या भीतीने सदर बिबट विहिरीतील कपारीत जाऊन बसले होते.शेत मालक आणि परिसर वासियांकडून याची माहिती मोताळा वन विभागाला देण्यात आली.यावर वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. विहिरीची खोली आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन बिबटच्या सुटकेसाठी बुलढाणा येथून वन विभागाच्या बचाव पथकाला पाचरण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाकडून या बिबट्याचे ‘फिजिकल रेस्क्यू’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोऱ्याच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला.नंतर पिंजरा विहीरीतून बाहेर काढून बिबटयाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मोताळा येथील पशुधन विकास अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करुन सदर मादी बिबट सुदृढ असल्याचे सांगितले. बुलढाणा वन उप संरक्षक सरोज गवस, सहायक उप वनसंरक्षक (एसीएफ) अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली. बिबट्याला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात काळ मंगळवारी रात्री निसर्ग मुक्त करण्यात आले. सदर कार्यवाही मोताळा वनपरीक्षेत्र अधिकारी के.डी.पडोळ,संतोष जाधव, राज सिरसाठ, ‘रेसक्यु टीम शुटर’ संदीप मडावी, अमोल चव्हाण, पवन वाघ, पवन मूळे, अक्षय बोरसे यांनी पार पाडली.