बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज आपली भेट घेतली. लाखो सोयाबिन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक लावणार असल्याची माहिती, राज्याचे सहकारमंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली. बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात माध्यमाशी बोलताना त्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक लावण्यात येईल असे वळसे पाटील म्हणाले.
सोयाबिन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या विविध मागण्यासंदर्भात आपली तुपकरांशी चर्चा झाली. त्यांच्या मागण्यासंदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत. तसेच पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक लावणार असल्याचे ते म्हणाले. रविकांत तुपकर यांच्या मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलन संदर्भात विचरणा केली असता, पालकमंत्र्यानी, ‘वातावरण इतके पांगलेले नाही, त्यामुळे आंदोलनाचे काम पडणार नाही’ असे सूचक विधान केले.
‘ठोस कार्यवाही करा अन्यथा आंदोलन अटळ’
दरम्यान पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर तुपकरांना माध्यम प्रतिनिधींनी गाठले! यावेळी तुपकर यांनी भेटीचा तपशील सांगितला. पालकमंत्र्यांकडे आपण सोयाबिन,कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या,वेदना अडचणी मांडल्या. तसेच पिकांना चांगला हमी भाव, संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करा , नुकसानभरपाई दाखल १० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या आदी मागण्यांवर चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी किंवा सरकारने तातडीने ठोस कार्यवाही करीत लाखो शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे. जुजबी अश्वासनावर ‘थांबण्याची’ आमची तयारी नाही. २९ तारखेच्या ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनाची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आम्ही २८ ला शेकडो शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडे कूच करणार असा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.