बुलढाणा : हजारो शेतकऱ्यांच्या शेतात खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून पानी देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी शेतकरी आंदोलक कैलास नागरे यांनी तहहयात संघर्ष केला. शेवटी त्यासाठीच त्यांनी आत्महत्या करून प्राणाची आहुती दिली. शेतकरी आंदोलक कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम काल रविवारी, १६ मार्चला त्यांचे मूळ गाव शिवणी अरमाळ (तालुका देऊळगाव राजा ) येथील शेतात पार पडला.

त्यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांच्या सडेतोड, परखड मनोगताने आणि नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेने हा कार्यक्रम गाजला. कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी मंत्री प्रतापराव जाधव व सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांच्या साक्षीने सर्वच राजकारण्यांना खडेबोल सुनावले. यावेळी बुलढाण्यासह विविध जिल्ह्यातील शेकडो शेतकरी , महिला शेतकरी, शोकाकुल नातेवाईक उपस्थित होते. यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी असलेल्या सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. ” माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका… तर बलिदान हा शब्द वापरा. माझ्या भावाला हे माहीत होते की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिले आहे. राजकारणी देशाला कृषी प्रधान म्हणतात. मात्र, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी करत असेल तर यांना लाजा वाटल्या पाहिजे. पालकमंत्री मकरंद पाटील यांना माझ्या भावाने वारंवार विनंती केली, विनवण्या केल्या.मात्र पालकमंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारता? असा सवाल त्यांनी केला. नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी सुनावले.

रक्षा विसर्जन कार्यक्रमा दरम्यान सत्यभामा नागरे यांनी राजकारणांना सुनावलेले खडे बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे हे खाली मान घालून ऐकत असल्याचे यावेळी दिसून आले . दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी आपल्या मनोगतातून केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली. खडकपूर्णा धरणाच्या पाण्यावरून एका अस्सल भूमीपुत्राने आत्महत्या केली. मात्र स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेणारे नामदार जाधव यांनी बुलढाण्यासाठी खडकपूर्णा धरणातून नेण्यात आलेल्या पाण्याचे बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात पूजन केले. हे करून त्यांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे ते म्हणाले.

भूमिपुत्र आत्महत्या करीत असताना त्यांना (जाधव यांना )स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेण्याचा काय अधिकार, असा सवाल खेडेकर यांनी विचारला. त्यानंतर संबोधित करण्यासाठी उठलेले नामदार जाधव यांनीही खेडेकरांवर टीकास्त्र सोडले. कधी शेतात न जाणाऱ्याने शेती व शेतकऱ्यावर बोलण्याचा अधिकार काय? खेडेकरांनी आपली पातळी पाहून बोलावे अशी तंबी त्यांनी शोकाकुल नातेवाईक आणि शेतकऱ्यांसमोर दिली.

Story img Loader