बुलढाणा : शीर्षक वाचून कुणीही दचकणे वा गोंधळात पडणे स्वाभाविकच आहे! ईडी-आयकर विभागाच्या कारवाईच्या जमान्यात काहीही होऊ शकते असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे खामगाव तहसीलदाराने बजावलेली ही नोटीस प्रारंभी चर्चेचा विषय ठरली… मात्र, सगळ्यांच्या मनात आले तसं काही नाहीये बरं का! खामगाव तहसीलदार यांच्याकडून नोटीस मिळालेले हे महाशय शरद पवारच आहेत, मात्र ते ‘बारामतीकर’ नसून बुलढाणा जिल्ह्यातील टेंभुर्णा (ता. खामगाव) येथील रहिवासी आहे.
हे शरद पवार खदान मालक आहेत. अवैध गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण आहे. एका गटाची गौण खनिज उत्खननाची परवानगी घेऊन दुसऱ्याच गटातील उत्खनन केल्याचे हे प्रकरण आहे. टेंभुर्णा येथील गट नंबर (९०) मधील गौण खनिज उत्खननाची परवानगी घेऊन, गट नंबर (९१) मध्ये उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचा भंग झाल्याने खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी खदान मालक शरद पवार यांना नोटीस बजावून ३१ मे रोजी समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गट नंबर (९०) हा शरद पवार (रा. टेंभुर्णा) यांच्या मालकीचा आहे. या गटातील गौण खनिज उत्खननाची परवानगी काढून त्यांनी खाणकाम क्षेत्रात समाविष्ट नसलेल्या लगतच्या गट नंबर (९१) मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करून महसूल बुडवून शासनाचे नुकसान केले आहे.
हेही वाचा – रोमन न्यायदेवीऐवजी भारतीय न्यायदेवतेसाठी मोहीम!
जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी करून, गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करून महसूल वसूल करावा, असा आदेश देण्यात आला आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचे उघड
तहसीलदार पाटोळे यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी आवार व तलाठी टेंभुर्णा यांनी स्थळ निरीक्षण केले आहे. गट क्रमांक (९१) हा खाणकाम क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याआधी मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा अहवाल सादर केला आहे. तहसीलदार पाटोळे यांनी खदान मालक शरद शोभाराव पवार यांना तशी नोटीस बजावली आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार मोका पाहणीमध्ये गट नंबर (९०) मधील गौण खनिज उत्खननाची परवानगी काढलेली असून उत्खनन मात्र गट नंबर (९१) मध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक केल्याबाबतच्या रॉयल्टी पावत्या तसे उत्खनना बाबतची संबंधित कागदपत्रे व लेखी खुलासासह ३१ मे रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे नमूद केले आहे. याबाबतचा खुलासा मदतीमध्ये सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही तहसीलदार यांनी आपल्या नोटिशीमध्ये दिला आहे.
हेही वाचा – स्मार्ट मीटरविरोधात लोकलढा! नागपुरात विविध संघटना, राजकीय पक्षांचा निर्धार
तहसीलदारांनी बजावलेल्या या नोटीसची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. शिवाय, हे शरद पवार नेमके आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.