बुलढाणा : क्षुल्लक कारणावरून माथेफिरू युवकाने तिघा मायलेकीवर चाकूने हल्ला केला. यात एका युवतीचा मृत्यू झाला असून दोघींची प्रकृती गंभीर आहे. त्या रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. यामुळे खामगाव शहर हादरले असून नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

खामगाव शहरातील बोबडे कॉलनीमध्ये मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी बुधवारी, बारा फेब्रुवारीच्या उत्तररात्री तीन वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत उर्फ गोलू चरणदास सारसर (वय पंचवीस, राहणार बोबडे कॉलनी, खामगाव, जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव शहर पोलिसांनी घटनेनंतर तपास चक्रे फिरवून आरोपी गोलू याला बुधवारी उत्तररात्री अटक केली आहे.

प्रकरणी जखमी कुमारी हर्षा सुरेश पटे (वय सोळा, बोबडे कॉलनी) हिने घटनेची तक्रार दिली. यानुसार बोबडे कॉलनीमधील पटे यांच्या घरासमोर रस्त्याचे काम सुरु आहे. काल मंगळवारी रात्री हर्षा हिची आई आणि मोठी बहीण संध्या पटे या घरासमोर बसल्या होत्या. यावेळी आरोपी गोलू याने रस्त्याचे बांधकाम करायचे नाही असे सांगत वाद घातला. तसेच चाकूने सौ. पटे यांच्या पोटात वार केले. यामुळे हर्षा आणि संध्या सोडवायला गेल्या असत्या त्याने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. संध्या हिच्या पोटात चाकूने वार केल्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने तिला फरफटत नेत तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले. यानंतर आरडा ओरड झाल्याने आरोपी फरार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संध्या पटे हिला अत्यावस्थेत अकोला येथे उपचारसाठी हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान संध्याचा मृत्यू ओढावला.

Story img Loader