बुलढाणा : विहिरीचे खोदकाम सुरु असताना क्रेनचा लोखंडी टप अंगावर पडून विहिरीत असलेल्या एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने चार मजूर बचावले आहे. ते किरकोळ जखमी झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील आणि आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी या गावात मंगळवारी ही दुर्घटना घडली आहे. प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद मनोहर सावदेकर (वय एकोणचाळीस, राहणार पळशी झाशी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा) असे मृत मजुराचे नाव आहे. फिर्यादी व मृत मजुराचा भाचा धम्मपाल लक्ष्मण हिवराळे (वय अडोतीस, राहणार पळशी झाशी, तालुका संग्रामपूर) यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – गोंदिया : दोन तालुक्यांतील ४८ गावांचा पाणी पुरवठा बंद, काय आहे कारण?
पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार विनोद सावदेकर हे हरीदास तोताराम बांगर ( राहणार पळशी झाशी ) यांच्या शेतामध्ये मजुरीने विहिरीचे काम करण्यासाठी गेले होते. त्यांच्या समवेत आणखी मजूर देखील कामावर होते. तेथे लोखंडी टप मातीने भरुन क्रेनच्या सहायाने विहिरीबाहेर टाकण्यात येत होते. त्यासाठी पाच मजूर विहिरीत उतरले होते. विहीरीतून लोखंडी टप मातीने भरुन क्रेनने वर जात असताना क्रेनचा वायरोप अचानक तुटला. यामुळे मातीने भरलेला लोंखडी टप हा विनोदच्या अंगावर वेगाने कोसळला. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने विनोद सावदेकर याचा जागीच करुण अंत झाला. यावेळी विहिरीत असलेले मुरलीधर चव्हाण, भगत डाबेराव, शिवाजी चव्हाण, संदीप चव्हाण हे नशीब चांगले म्हणून बचावले. ते किरकोळ जखमी झाले आहे. मात्र त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याने त्यांच्यावर उपचार करावे लागले.
हेही वाचा – नितीन गडकरींच्या जिल्ह्यात अपघाती मृत्यू जास्त, शहराच्या तुलनेत ग्रामीणला…
फिर्याद दाखल अधिकारी संतोष डाखोरकर हे असून तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार
प्रमोद मुळे तपास करीत आहे. विनोद याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याची चार मुले उघड्यावर पडली आहेत.