बुलढाणा: विदर्भाच्या टोकावरील चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली खरी मात्र नशीब बलवत्तर म्हणून ४८ प्रवाश्यांचे (वऱ्हाड्यांचे) प्राण वाचले! प्राप्त माहितीनुसार हे सर्व नशीबवान वऱ्हाडी चहाची तल्लफ भागविण्यासाठी खाली उतरल्याने त्यांचे प्राण वाचले. प्रवासी बालबाल बचावले असले तरी त्यांच्या बॅग आणि मौल्यवान दागिने मात्र जळून खाक झाले आहेत. तसेच खाजगी बसचे मोठे नुकसान झाले असून बसचा केवळ सांगाडाच उरल्याचे वृत्त आहे. ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागून बस उभी पेटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर आज मंगळवारी ( दिनांक २५) रोजी सकाळी हा खळबळजनक आणि अंगावर काटे आणणारा घटनाक्रम घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, वऱ्हाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलढाणा येथे ट्रॅव्हल्स बसने लग्न आटोपून येत होते. पहाटे मेहकर फाट्यावर खासगी बस चहापाणी करण्यासाठी थांबली. यावेळी काही प्रवासी गाढ झोपेत होते. मात्र बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमध्ये एकच गदारोळ होऊन सर्व प्रवासी जागी झाले. जीव वाचविण्यासाठी खाली उतरण्यासाठी बसमधील प्रवाश्यांची एकच धावपळ उडाली. प्रवाशी खाली उतरताच काही वेळातच खाजगी बस उभी पेटली. काही क्षणात या बसचा कोळसा झाला आणि केवळ सांगडाच उरला.
बस पेटल्याच्या या भीषण दुर्घटनेची माहिती चिखली पोलीस, चिखली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून भीषण आग आटोक्यात आणली. मात्र ही आग विझविण्यासाठी त्यांना कमीअधिक अर्धा तास लागल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि प्रवाश्यांनी सांगितले. खाजगी बस बुलडाणा येथील पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. मात्र याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही.
पेटत्या बसचे दृश्य भयावह
दरम्यान घटनास्थळीचे पेटत्या खाजगी बसचे दृश्य भयावह आणि जीवाचा थरकाप उडविणारे होते. प्रारंभी एका भागाकडून पेट घेतलेली बस पाहता पाहता चोहो बाजूंनी पेटली. यामुळे अंधारला भाग प्रकाशाने उजळून निघाला. यामुळे मार्गावरील इतर लहान मोठी वाहने चालकांनी सुरक्षित अंतरावर नेली. वऱ्हाडी दूरवरून पेटलेली बस पाहत होते, तेव्हा त्यांना आपण जिवाच्या संकटातून वाचल्याचे जाणवत होते. या दुर्घटनेने अनेकांना समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताची आठवण झाली. सिंदखेडराजा नजीकच्या त्या दुर्घटनेत पंचवीस प्रवाश्यांचा जळून कोळसा झाला होता. त्यांची डीएनए चाचणी करुनच ओळख पटविण्यात आली होती. मात्र सुदैवाने आजच्या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहे.