बुलढाणा : राज्यातील मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने पत्रकारांसंदर्भात उधळलेल्या मुक्ताफळांचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले. या विरोधात ‘आधुनिक गांधीगिरी’ करीत स्थानिक पत्रकारांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना ढाब्यावर भोजनाचे निमंत्रण दिले. हे निमंत्रणही तोंडी नव्हे तर पत्रिकाद्वारे देण्यात आले. मंगळवारी संग्रामपूर येथे पत्रकारांनी नेत्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
हेही वाचा >>> १५ हजार कुटुंबे, ११ हजार घरे आणि बरेच काही, नागपूरमध्ये पुरामुळे मोठे नुकसान
बुधवारी बुलढाण्यातील पत्रकारांनी निमंत्रण आंदोलन करून निषेध व्यक्त केला. निमंत्रण पत्रिकाद्वारे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. अलीकडच्या काळामध्ये ५२खुळे यांच्या वाणीला पत्रकारांच्या संदर्भात अप्रतिम घुमारे फुटत आहेत. त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना अफलातून सल्ला देत आहेत. त्यांचा निषेध करत त्यांच्या छायाचित्राला नैवेद्य दाखवून ५२खुळे वैकुंठधाम धाब्यावर सस्नेह भोजनाचे निमंत्रण देण्यात येत आहे, अशाप्रकारची निमंत्रण पत्रिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.