बुलढाणा : प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बुलढाणा मतदारसंघातील चुरस तीव्र झाली आहे. यंदाच्या लढतीत पक्षीय उमेदवारांसह प्रमुख अपक्षांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे अखेरच्या टप्प्यात मतांचे होणारे ध्रुवीकरण व विभाजन निकालात निर्णायक ठरणार आहे. हे दोन घटक अनुकूल ठरणारा उमेदवार विजेता ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाण्यात प्रारंभी दोन शिवसेनेतील दुरंगी लढत अपक्ष रविकांत तुपकरांमुळे तिरंगी ठरली आहे. महायुतीचे प्रतापराव जाधव ( शिंदे गट) आणि आघाडीचे नरेंद्र खेडेकर ( ठाकरे गट) यांच्यासाठी गठ्ठा मतदान मुख्य ताकद आहे. भाजप बरोबरच पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार राजेंद्र शिंगणे सोबत असल्याने जाधव यांच्या विरोधात होणारे मतदान अर्थात मतविभाजन टळणार आहे. यामुळे खासदार अंतिम टप्प्यातही प्रचारात आघाडीवर आहे.
प्रचारादरम्यान जाधव यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडून अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणले. संभाजी ब्रिगेडने जाहीर नाराजी व्यक्त करून ठाकरे गटाला इशारा दिला. या बाबी आघाडीचे खेडेकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसच्या काही गटांचे प्रचारापासून अलिप्त राहणे या अडचणीत भर ठरत आहे. मात्र निष्ठावान सैनिकांची मते, दलित मुस्लिमांची गठ्ठा मते, या बळावर खेडेकर शर्यतीत टिकून आहेत. या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची कसोटी लागणार आहे. बुलढाण्याचा निकाल ‘असली-नकली शिवसेने’चा निर्णय करणारा ठरणार आहे. यामुळे जाधव व खेडेकर यांचीच नव्हे तर अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा – “आता बस झाले, यापुढे सभा मिळणार नाही,” कोणी दिला इशारा? जाणून घ्या सविस्तर…

प्रस्थापितांकडेच प्रतिनिधीत्व, की युवा पिढीच्या हाती धुरा?

दुसरीकडे, प्रथमच लोकसभा लढणारे वंचितचे वसंत मगर, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि संदीप शेळके यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वंचितला मागील निवडणुकीएवढे मतदान घेणे आवश्यक ठरले आहे. अपक्ष उमेदवार तुपकर यांना मिळत असलेला प्रतिसाद मतदानात परावर्तीत होतो का? हा राजकीय उत्सुकतेचा प्रश्न आहे, तर संदीप शेळके यांचे भावी राजकारण ठरविणारी ही निवडणूक आहे. यंदा बुलढाणा लोकसभेचे प्रतिनिधित्व प्रस्थापित नेतेच करणार की युवा पिढीच्या हाती धुरा जाणार, हे ठरविणारी ही लढत आहे.

विभाजन कुणाच्या पथ्यावर?

या लढतीत होणारे मतविभाजन व मतांचे ध्रुवीकरण कुणाच्या पथ्यावर पडते, हा घटक निकालात निर्णायक ठरणार आहे. साडेपाच लाखांच्या आसपास असलेल्या सकल मराठा समाजाचे मतविभाजन अटळ आहे. ते सहा ठिकाणी विभागणार आहे. त्याचा मोठा हिस्सा कोणत्या उमेदवाराला मिळतो, हा उत्सुकतेचा विषय व निर्णायक प्रश्न आहे. याशिवाय वंचितला किती मतदान पडतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. वसंत मगर यांनी लाखाचा टप्पा ओलांडणे आघाडीसाठी धोक्याची बाब ठरणार आहे. बसपा व आंबेडकरी समाजातील अपक्षांना मिळणारे मतदानही त्यांना धोका आहे. मात्र हे विभाजन कमी झाले तर आघाडीचे खेडेकर यांना लाभदायक ठरेल. अपक्ष रविकांत तुपकर व संदीप शेळके यांना मिळणारे मतदान व त्यामुळे होणारे विभाजन युती व आघाडीला मारक ठरणार, असा अंदाज आहे. मात्र जास्त फटका कुणाला, हा कळीचा मुद्दा आहे.

हेही वाचा – जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त

स्टार प्रचारकांच्या सभांवर जोर

युतीच्या एका नेत्याने ‘अँटिइन्कबन्सी’मुळे विरोधात जाणारी मते आघाडी व दोन अपक्ष यामध्ये विभाजित होणार आहे, यामुळे आमची जागा सुरक्षित असल्याचे समीकरण मांडले. मात्र शेवटच्या टप्प्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक यांच्या संयुक्त सभेमुळे दलित, मुस्लीम व ओबीसी मतांचे ध्रुवीकरण वा टळणारे विभाजन आघाडीला बळ देणारे ठरेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे हिंदुत्ववादी, ओबीसी मतांचे मोठ्या प्रमाणावर होणारे ध्रुवीकरण युतीला तारक ठरणार आहे. अंतिम टप्प्यातील स्टार प्रचारकांच्या सभामुळे मतदारसंघ ढवळून निघणार आहे. युतीने अंतिम टप्प्यात सभावर जोर देऊन संभाव्य मतविभाजन टाळण्यावर जोर दिल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha in buldhana party candidates along with independents also have a test polarization and division of opinions will be decisive scm 61 ssb