बुलढाणा : एकेकाळच्या पहाटेच्या शपथविधीप्रमाणे बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक अन् ‘महत्वाकांक्षी’ आमदार संजय गायकवाड यांनी काटेकोर गुप्तता पाळत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे जिल्ह्याच्याच नव्हे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. अगदी भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी यांनाही खबर लागू न देता त्यांनी केलेल्या खेळीने मित्र-शत्रू सर्वच थक्क झाले . योगायोगाने संध्याकाळीच प्रतापराव जाधव यांना ‘दिल्लीचे तिकीट’ मिळाले. यामुळे आमदार संजय गायकवाड यांचा अर्ज म्हणजे भाजपवर दवाबतंत्राचा यशस्वी वापर, असे मानल्या जात आहे.
शिंदे गटाचे निरीक्षक विलास पारकर हे गुरुवारी( दि २८) सकाळपासून आमदारांच्या दरबारात ( संपर्क कार्यालयात) ठाण मांडून होते. मात्र त्यांना ‘चाहूल’ लागू न देता आमदारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, असे सांगण्यात आले. पारकर यांनी हाच ‘किस्सा’ सांगितला. संजय गायकवाड यांनी परिपूर्ण भरलेला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत मोजके शिलेदार व विधीज्ञ उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार, सकाळी ११.३० चा मुहूर्त ठरला होता. मात्र आलेला ‘महत्वाचा फोन’ आणि अनुषंगिक कारणांमुळे हा मुहूर्त दुपारी २ वाजेपर्यंत लांबला. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे(!) आपण अर्ज दाखल केल्याचे सांगून आपण लढण्यावर ठाम असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठासून सांगितले. यादरम्यान त्यांना मुख्यमंत्र्यांचे किमान दोन फोन आले. मात्र ते पारकर यांच्यामार्फत. निरीक्षकांना ही घडामोड, पडद्याआडच्या हालचाली माहीत नसतील, ही मुळीच पटणारी बाब नाही.
हेही वाचा…“जावई बापू प्रथम, नंतर सगेसोयरे,” शरद पवारांनी परंपरा राखली; एका दगडात दोन पक्षी…
वादळ अन् धावपळ
अर्ज भरण्याची बातमी वाऱ्यासारखी मतदारसंघात फिरली आणि राजकीय वादळ ठरली! उमेदवारी निश्चित या खात्रीने समजून बुलढाण्यात २९ मार्चला आयोजित महायुती मेळाव्याच्या तयारीत प्रतापराव जाधव हे बुलढाण्यातच होते. त्यांनी मुरलेल्या राजकारण्यासारखे उत्तर देत संक्षिप्त प्रतिक्रिया दिली. ‘गायकवाड यांनी अर्ज का सादर केला ते त्यांनाच ठाऊक, कदाचित पक्षाने त्यांना ‘एबी फॉर्म’ दिला असेल, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर मात्र थेट आमदारांचे कार्यालय गाठले! तिथे दोघा नेत्यांची बंदद्वार चर्चा झाली. बाहेर आल्यावर आमदारांनी आपण लढण्यावर ठाम असल्याचे तर खासदारांनी त्यांना तिकीट मिळाले तर मी १०० टक्के त्यांचे काम करेल, असे धूर्त उत्तर दिले. यानंतर दोन्ही नेते मेळाव्याच्या ठिकाणाकडे पाहणीसाठी रवाना झाले.
भाजपा नेत्यांनी यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. (शांतपणे मुंबई व दिल्ली दरबारी’ अहवाल’ मात्र पाठवून दिला). दरम्यान , आमदारांचा अर्ज ही शिवसेनेतील दुफळी, उठाव की भाजपावर दवाब कायम ठेवण्याचे डावपेच? असे संभ्रम निर्माण करण्यात शिंदे गट बऱ्यापैकी यशस्वी ठरला. त्यामुळे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ किंवा खासदारांचा कथित ‘प्रतिकूल अहवाल’ या सबबीखाली बुलढाण्याची जागा भाजपाकडे ( वा अजितदादाकडे) जाऊ नये, यामुळे त्यांनी हे डावपेच खेळल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
हेही वाचा…विजय वडेट्टीवार समर्थकांच्या भाजप प्रवेशाने तर्कवितर्क; लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला गळती
कालपरवा दिल्लीत झालेल्या ‘उच्च स्तरीय’ बैठकीत हे मुद्दे पुन्हा समोर आले. यामुळे उमेदवार बदलाचा, कमळावर लढण्याचा भाजपाचा अघोषित पर्याय स्वीकारावा लागलाच तर आपली तयारी असावी, पण जागा शिवसेनेकडेच ठेवायची, असे डावपेच यामागे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाचा एक इच्छुक आमदार कालपरवा दिल्लीवारी करून आला. याशिवाय भाजपच्या संभाव्य यादीत शिंदे गटाला अजिबात न चालणारा ‘हाडवैरी’ असल्याच्या शक्यतेमुळे देखील अर्जाचा घाट घालण्यात आला असावा. कमी जागा मिळालेल्या अजितदादा गटाचादेखील बुलढाण्यावर छुपा दावा आहे. जिल्हा बँकेला मिळालेल्या ‘सॉफ्ट लोन’मुळे राजेंद्र शिंगणे देखील लढण्यास तयार आहे. या साऱ्या व अन्य काही राजकीय हालचालींना किमान ४ एप्रिल या उमेदवारी अर्जाच्या अंतिम मुदतीर्यंत थोपविण्याचा ‘गेम’ उमेदवारी अर्जात दडलेला होता. मनासारखे झाले नाही तर शिंदे गट ‘उठाव’ करू शकतो हे अप्रत्यक्षपणे दर्शविण्यात आले. यामुळे जाधवांची आणखी लांबणारी घोषणा लगेच गुरुवारीच झाली.
हेही वाचा…धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
या नाट्यात आमदार हेच ‘हिरो’ होते असे नव्हे तर उमेदवार जाधव हे देखील ‘हिरो’च ठरले. यामुळे अर्जाची तिरकस चाल वा ‘नाथां’च्या आशीर्वादामुळे रंगलेले अर्ज नाट्य शिंदे गटाचा ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.