बुलढाणा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्याने हादरलेल्या काँग्रेसने ‘डॅमेज कंट्रोल’ चे प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाने सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक बोलाविली असून जिल्ह्यातील एकमेव आमदार राजेश एकडे मुंबईत दाखल झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे काँगेसचे आमदार राजेश एकडे यांनी याला पुष्टी दिली असून मुंबईत दाखल झालो असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यमय घडामोडीमुळे व्यस्त असतानाही त्यांनी अनौपचारिक चर्चा करीत या माहितीला दुजोरा दिला. राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपण राजधानीत आल्याचे आमदार एकडे म्हणाले. बुधवारी संध्याकाळी आयोजित काँग्रेस पक्षाच्या तातडीच्या बैठकीला हजर राहणार असल्याची माहितीही आमदार एकडे यांनी दिली.
हेही वाचा : चला खरेदीला, सोने निच्चांकी पातळीला…
आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष सोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आज अशोक चव्हाण यांनीही बैठक बोलविल्याची चर्चा आहे. मात्र. मी पक्षासोबतच राहणार असून संध्याकाळी आयोजित पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे व काँग्रेस सोबतच राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रानुसार आजच्या बैठकीचे निमंत्रण भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधून देण्यात आले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारांना थेट बोलून बैठकीसाठी ‘मुंबईत हाजीर हो’ चे आदेश दिले. या बैठकीसंदर्भात काटेकोर गुप्तता पाळण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.