बुलढाणा: विदर्भाचे प्रवेश द्वार आणि खान्देश व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या मलकापूर शहराची रविवारची दुपार शहर वासियांना हादरविणारी ठरली! ऑक्सिजन सिलिंडर चा भीषण स्फ़ोट होऊन एक इसम ठार झाला तर दोघे जन गंभीर जखमी झाले.
मलकापूर शहरातील लक्ष्मीनगर परिसरात हा खळबळजनक आणि तितकीच भीषण घटना घडली. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार घटनेची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यानुसार लक्ष्मी नगर भागात आज रविवारी, २३ मार्च रोजी दुपारी एका ऑटोमध्ये ऑक्सीजन सिलिंडर टाकत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिलिंडर चा स्फ़ोट नेमका कश्यामुळे झाला हे कळू शकले नाही.प्राथमिक माहितीनुसार, ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलिंडर ठेवत असताना गॅस गळती किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्फ़ोटाचा जोरदार आवाज एकटाच परिसरातील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटना स्थळीचे दृश्य मनाला हेलावून टाकणारे होते. नागरिकांनी जखमींना दिलासा दिला. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मलकापूर पोलीस दाखल झाले असून स्फ़ोट नेमके कश्यामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे.