बुलढाणा: दारुड्या पतीच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने स्वतःला पेटवून घेतले. मात्र व्यसनी नवऱ्याने तिला वाचवायचा प्रयत्न न करता उलट,’ मरायचे तर आत्ताच मर’ असे म्हणत झोपी गेला. या निष्ठूर पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गुरुवारी ,२९ ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी हा निकाल दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दारूचे व्यसन माणसाला कोणत्या थराला नेते आणि त्यामुळे तो आपल्या जिवलगा सोबत किती क्रूरतेने वागू शकतो याचा प्रत्यय आणणाऱ्या घटना आणि खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे.

हेही वाचा…बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षांची शिक्षा

चिखली तालुक्यातील किन्होळा येथील अमोल वाघमारे याचा अर्चना सोबत सात आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आरोपी पती अमोल हा दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे तो सतत अर्चनाला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. तसेच पैसे न दिल्यास तिला मारहाण करीत होता. सततच्या त्रासाला कंटाळून अर्चना घटनेच्या दोन महिन्यापुर्वी माहेरी निघुन गेली होती. मात्र पोटच्या दोन लहान मुलांचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून ती परत पती सोबत नांदण्यास किन्होळा येथे आली होती. २० जुलै २०१६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी पती हा दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने पत्नी अर्चनास तू दोन महिन्यापूर्वी माहेरी का गेली होती? असा जाब विचारून भांडण उकरून काढले. एवढ्या वरच न थांबता त्याने ( पती अमोल याने) या कारणावरून अर्चनाला बेदम मारहाण केली. त्यामुळे अर्चनाने घरातील रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी पती अमोल अर्चनाला म्हणाला, ‘तुला मरायचे तर आताच मर, असे म्हणून झोपी गेला. त्यानंतर अर्चनाने स्वत:ला पेटवून घेतले. तिचा ओरडण्याचा, करुण किंकाळ्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यानी अर्चनाच्या घरी धाव घेतली. त्यांनी शेजार धर्म पालन करून तिला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यु झाला.

हेही वाचा…माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…

प्रकरणी अर्चनाचा भाऊ समाधान पाटील याने चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी पती अमोल वाघमारे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. तपासाअंती आरोपी विरुध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी आरोपी पती अमोल वाघमारे यास तीन वर्षे सश्रम कारावास व॒ दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. तसेच दंड न भरल्यास तीन महीने सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड सोनाली सावजी देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून हवालदार नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले. या बहुचर्चित खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी किन्होळा गावासह चिखली तालुक्यातील नागरिक, मृत महिलेचे नातेवाईक यांनी बुलढाणा न्यायालय परिसरात बरीच गर्दी केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana man sentenced to 3 years for letting wife die by self immolation ignoring her cries for help scm 61 psg