बुलढाणा : अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर परिसरात घडली आहे. यामुळे समाजमन हादरले आहे.
पीडिता शाळेत जात असताना आरोपी नेहमीच तिचा पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची बालिकेवर वाईट नजर होती. घटना प्रसंगी त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने तिला धमक्या देत बळजबरीने मोटरसायकलवर बसवून गावाबाहेर बायपास वरील निवांत लॉजवर नेले.
हेही वाचा…अनियंत्रित कारचे तुकडे हवेत उडले… अभूतपूर्व अपघातात प्रवाशांचे जे झाले ते,…
एका खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक अत्याचार केले. याची वाच्यता कुठे केली तर ठार मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या तोंडी तक्रारी वरून मेहकर पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण, (वय २० राहणार खंडाळा, तालुका मेहकर )तसेच ओम प-हाड (२०, रा. बाभुळखेड, ता. मेहकर) या दोघांविरोधात पोक्सो, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेचे गंभीर्य आणि पोकसो, ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी नुसार या दुर्देवी घटनेचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहे. या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.