बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले. त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते ठासून म्हणाले.

हेही वाचा…वर्धा लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस आग्रही, रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांना जिल्ह्यातील नेत्यांचे साकडे; जागेचा तिढा दिल्ली दरबारात?

वाघ दंत अन् जमीन ताबा

मी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाने गुन्हा दाखल केला, माझ्या गळ्यातील कथित वाघ दंत जप्त केला. मात्र तो दात प्लास्टिकचा असल्याचा दावा करून प्रथमदर्शनी तसे आढळून आल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. मोताळा तालुक्यातील जमीन ताबा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. ते ‘क्रॅश’ करण्यासाठी आपण लवकरच ‘हायकोर्टा’त जाणार असल्याची माहितीही आमदारांनी दिली. त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय व चौबे यांच्यातील आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana mla sanjay gaikwad defends himself in beating youth incident during shiv jayanti procession said it a matter of pride scm 61 psg