बुलढाणा : बीड शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा भस्मासूर हातपाय पसरत आहे. मस्साजोगचे सरपंच संजय देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी निष्पक्षपातीपणे कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिल्याने जलदगती कारवाई आणि न्यायनिवाडा होणार याची आम्हाला खात्री आहे. मात्र वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
गायकवाड यांचे हे विधान महायुतीला घरचा आहेर असल्याचे मानले जात आहे. याच बरोबर नुकत्याच पार पडलेल्या बुलढाणा विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठी युतीच्या नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराला उघडपणे सहकार्य केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा…एसटी महामंडळाला निधी नाही.. तर पंचसूत्रीबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
मलकापूर मार्गावरील आपल्या जन संपर्क कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांनी आज शनिवारी, २८ डिसेंबर रोजी दुपारी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी आपल्या नेहमीच्या ‘स्टाईल’नुसार आमदार गायकवाड यांनी सडेतोड आणि रोखठोक विधाने करीत राजकीय खळबळ उडवून दिली. सध्या राज्यात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्याकांड, त्यावरून राज्यात उठलेले वादळ, आज बीडमध्ये निघालेला सर्वपक्षीय निषेध मोर्चा यावर छेडले असता आमदारांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.
हेही वाचा…गडकरींच्या नाराजीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे विमानतळाची जबाबदारी
बीडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे असे सांगून ते म्हणाले की तेरा तालुक्यांचा विस्तार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात साडेआठशेच्या आसपास अग्नीशस्त्र परवाना धारक आहेत.त्या तुलनेत एकट्या बीड शहरात हीच संख्या१०२२ आहे. वाल्मिक कराड याला खंडणी सारख्या अनेक गंभीर घटनांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच तो राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) नेता तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची नेत्यांनी पाठराखण करणे चुकीचे असल्याचे परखड मत गायकवाड यांनी व्यक्त केले. १९९२ मध्ये एका नेत्याच्या बंगल्यातून एक मोठा अधिकारी ‘गायब’ झाला होता आणि तो अजूनही सापडला नाही, असा गौप्यस्फोट गायकवाड यांनी यावेळी केला. मात्र त्याचा तपशील देण्याचे त्यांनी टाळले. सध्या तर बीडमध्ये गुन्हेगारीचा भस्मासूर फोफावला आहे.मात्र मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहात सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी कठोर निष्पक्ष कारवाईची ग्वाही दिली.तसेच जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात येईल, असे जाहीर देखील केले आहे, असेही गायकवाड म्हणाले.