बुलढाणा: दोन दिवसापूर्वी पोलिसाविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच महागात पडले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापाठोपाठ बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,२७ एप्रिलला बुलढाणा शहरात येत आहेत, या पार्श्वभूमीवर आ.गायकवाड यांना पोलिसांनी अर्थात गृह विभागाने शह दिला आहे. दरम्यान आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करुन चार पाऊले मागे घेतली

२५ एप्रिल रोजी आ. गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.” पोलिसां इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, एखादा कठोर कायदा केला की एक हप्ता वाढतो. पोलिसांनी एखाद्या कारवाईत ५० लाख पकडले की ५० हजार दाखवतात. पोलिसांनी इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते.” असे आ.गायकवाड म्हणाले होते दरम्यान याच वक्तव्यावरून आ. गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलिसच या प्रकरणात फिर्यादी आहे. पोलिसांप्रती वाईट भावना चेतवल्याचा आरोप आ. गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

दरम्यान आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संतप्त झाले आहेत. पोलिसांबद्दल हे असे बोलणे चुकीचे आहे, मी स्वतः या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे,की त्यांना कडक समज द्या. हे असं चालणार नाही, हे योग्य नाही.तरीही ते जर वारंवार बोलणार असतील तर कारवाई केली जाईल” अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली होती फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर आ.गायकवाड यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

‘हा माझा अनुभव’ – गायकवाड

दरम्यान प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना आमदार गायकवाड यांनी विधाना बद्धल दिलगिरी व्यक्त केली. “मी केलेले विधान मला आलेल्या अनुभवावरून होते. माझ्या त्या विधानामुळे महाराष्ट्र पोलिसांची व महाराष्ट्र सरकारची जर नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो” असे आ.गायकवाड आज माध्यमांशी बोलताना म्हणाले. देवेंद्रजींनी नाराजी व्यक्त केल्याचे मला कळाले, एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोनही आला होता असेही आ.गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तुम्ही तुमच्या विधानावर ठाम आहात का? असे आ. गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, त्या दिवशी चुकून महाराष्ट्र पोलीस असा उल्लेख झाला. तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाहीतर स्थानिकचा आहे, आणि स्थानिक च्या मुद्द्यावर मी ठाम आहे असे आ.गायकवाड म्हणाले.