बुलढाणा : वेळोवेळी विरोधकांबद्दल वादग्रस्त विधाने करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत राहतात. आता त्यांनी मतदारांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मोताळा तालुक्यातील जयपूर (कोथळी) येथे आमदार संजय गायकवाड यांचा तीन दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. नुकतेच पार पडलेल्या बुलढाणा विधासभा मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ ८४१ मतांच्या फरकाने निसटता विजय मिळाल्याचे शल्य आमदारांनी यांनी या कार्यक्रमातही बोलून दाखविले.
यावेळी शेलक्या भाषेत मतदारांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असा सनसनाटी आरोप संजय गायकवाड यांनी केला. तसेच काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
आमदार संजय गायकवाड यांचा विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून निसटता विजय झाला. कमी फरकाने झालेला विजय त्यांच्या जिव्हारी लागल्याचे अनेकवेळा दिसून आले. दोन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मतदान कमी मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली.
आपण मतदारसंघाचा चौफेर विकास केला, कोट्यवधींचा निधी आणला, मतदारसंघाचा कायापालट केला. तरीही मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान केले नाही याला काय म्हणावे? असा उद्विग्न सवाल आमदारांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना केला. यावरच न थांबता आमदार गायकवाड यांनी, आपल्या जाहीर भाषणात मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले. कार्यक्रम पार पडल्यावर आता त्यांच्या भाषणाचा ‘व्हिडीओ’ समाज माध्यमावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा : भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…
आमदार संजय गायकवाड व्हिडीओत म्हणतात, ‘तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त दारू, मटण पाहिजे. मी कोट्यवधींची कामे केली. तरीही लोकांनी मला मतदान केले नाही. मतदार दोन दोन हजारात विकले गेले आहेत. मी अब्जावधी रुपयांना लाथ मारली. शेवटी सत्याचा विजय झाला. माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले. परंतु सगळे लटकले, असे आमदार ठासून म्हणाले.
मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असा सनसनाटी आरोप संजय गायकवाड यांनी केला. तसेच काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/iyHSfbeFv7
— Chaitanya S. Sudame (@SudameChaitanya) January 6, 2025
निसटता विजय जिव्हारी
संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदार संघातून यंदा दुसऱ्यांदा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते. जयश्री शेळके यांना ९० हजार ८१९ मते पडली होती. संजय गायकवाड यांना ९१ हजार ६६० मते पडली होती. गायकवाड यांचा अवघ्या ८४१ मतांनी विजय झाला होता. विधासभा निवडणूक दरम्यान आमदार गायकवाड यांनी विरोधी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणताही असो आपण १ लाख १० हजाराच्या आसपास मते घेणारच असा दणदणीत दावा केला होता. आघाडीच्या उमेदवाराचा एकतर्फी पराभव करून चारी मुंड्या चित करून पराभव करणार असा दावा त्यांनी केला. प्रत्यक्षात ते केवळ ८४१ मतांनी विजयी झाले. प्रचारातच नव्हे तर मतमोजणीमध्ये देखील संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्यातील चुरस २४ आणि २५ व्या फेरीअखेर कायम राहिली. मात्र, अखेर गायकवाड यांनी बाजी मारली आणि ते सलग दुसऱ्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले.