बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर मागील २५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे.
पोलीस विभागाने सोमवारी, १६ डिसेंबर रोजी या प्रकरणात चार जणांना जेरबंद केले आहे. विक्की आव्हाड असे मुख्य आरोपीचे नाव असून तो बुलढाणा शहरातील जुनागांव परिसरातील मातंगपुरामधील रहिवासी आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीपैकी एक जण मोताळा येथील तो अल्पवयीन आहे. या कारवाईत विक्की गणेश आव्हाड (वय ३०, राहणार बुलढाणा), त्याचा भाऊ रवी गणेश आव्हाड बुलढाणा, अमोल सुनील अंभोरे (२३ वर्षे) आणि मोताळा येथील १७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाणे आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. यापूर्वी या गंभीर प्रकरणात १३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा बुलढाणा शहरातील इंदिरा नगर येथून करण काटकर याला ताब्यात घेण्यात आले होते. करण काटकर याने हल्ल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व आरोपीची माहिती मिळवली. यानंतर तपासाला गती मिळाली. यानंतर तीन दिवसांच्या कालावधीत वरील चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
हेही वाचा – भंडारा : शिवसेना विभाग प्रमुखाला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवीगाळ
या ५ आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून सदर हल्ला केला, याचाही तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हल्ल्यात वापरलेल्या लोखंडी रॉडचा देखील कसोशीने शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – बिबट्याची संख्या वाढली… आता नसबंदी हा एकच जालीम…
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादीचे कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ते तालखेड (तालुका मोताळा) येथील आपल्या शेतातून संध्याकाळी मोताळा येथे दुचाकीने येत असताना त्यांच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळीने हल्ला चढविला होता. लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांच्यावर बुलढाणा येथे उपचार करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या गुंडगिरीबद्दल पोलीस प्रसाशनाला धारेवर धरले होते. बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीत धमक्यांना न घाबरता आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा प्रचार केल्याने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता. या हल्ल्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार प्रामुख्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.