बुलढाणा : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले मलकापूर शहर आज धक्कादायक घटनेने हादरले! मलकापूर परिसरात एका तृतीयपंथीयाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून या हत्येचा उलगडा करण्याचे आणि मारेकऱ्याला जेरबंद करण्याचे आव्हान मलकापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलकापूर शहराची आजची सकाळ खळबळजनक घटनेने उजाळली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. एका तृतीयपंथीयाची धरणगाव परिसरात क्रूररित्या हत्या करण्यात आल्याच्या बातमीने शहरवासी हादरले! घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा…चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, मलकापूर धुपेश्वरदरम्यान धरणगावजवळ महामार्गाच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयाच्या डोक्यावर, मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत, रक्ताचे ओघळ आहेत. अत्यंत थंड डोक्याने मात्र निर्घृणरित्या ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. अतिरिक पोलीस अधीक्षक (खामगाव ) अशोक थोरात यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. यासंदर्भात संपर्क केला असता, मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांनी अधिक काही सांगण्यास नाकार दिला. वरिष्ठ अधिकारी आणि पथके घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे. यामुळे अधिका काही माहिती आणि मारेकऱ्याचा हेतू, आदी सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. दरम्यान या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. यामुळे घटनास्थळ परिसरात बघ्याची एकच गर्दी उसळली. या हत्येबद्दल विविध तर्क लावले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana one transgender brutally murdered in malkapur city scm 61 sud 02