बुलढाणा : साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुडी पाडव्याचा सण जिल्ह्यात सर्वत्र साजरा होत असताना देऊळगाव राजा तालुक्यासह पोलीस विभाग गुडी पाडव्याच्या दिवशी अक्षरशः हादरला! याचे कारण देखील तसे भयावह आहे. एका बंद (लॉक असलेल्या ) चारचाकी वाहनात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे.

यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांत खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आज, रविवारी, ३० मार्चला त्याच्याच मालकीच्या मारुती स्विफ्ट डिझायर वाहनात आढळून आला आहे.
प्राथमिक चौकशी आणि पाहणीत,ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (३८,राहणार गिरोली खुर्द, तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्ञानेश्वर म्हस्के जालना राष्ट्रीय महामार्ग पोलिस दलात कार्यरत होते .

प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा सिंदखेडराजा मार्गा वरील वरील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत म्हस्के यांची स्विफ्ट गाडी आढळून आली. या गाडीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. गाडी लॉक असून गळा आवळून घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. स्थानिक पोलिसांसह पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पुढील तपास सुरू आहे.

दुसरी घटना

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस हत्येची ही दुसरी घटना आहे. मागील २३ मार्चला अंढेरा पोलीस ठाणे मध्ये कार्यरत भागवत गीरी नामक पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटार सायकलने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीचा दुचाकीने पाठलाग करीत असताना आरोपीने दुचाकीला लाथ मारली. यामुळे वाहनाला अपघात होऊन गिरी यांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांचा एक सहकारी पोलीस गंभीर जखमी झाला होता. ही बातमी ताजी असतानाच देऊळगाव राजा मध्ये ही घटना घडली.