बुलढाणा: प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात आंदोलन पेटले आहे. आज सुमारे शेहचाळीस गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी निदर्शने केली. आज गुरुवारी (दिनांक २७) जूनच्या सकाळी अंत्री खेडकरसह अन्य गावात भक्तिमार्ग तातडीने रद्द करावा या मागणीसाठी थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. काही तासांमध्येच हे आंदोलन विस्तारले.
चिखली तालुक्यातील काही गावांमधून या आंदोलनाला सुरुवात झाली. आज गुरुवारी सिंदखेड- राजा शेगाव महामार्गावरील ४६ गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. सिंदखेडराजा शेगाव भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गावोगावी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
शासनाकडून प्रस्तावित सिंदखेडराजा शेगाव भक्ती महामार्ग गेल्या कित्येक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हजारो शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. ठिकठिकाणी निदर्शने व्यक्त केली जात आहे. सकाळपासून चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर या महामार्गावरील ४३ गावांनी आक्रमक रूप धारण केले. जमीन आमच्या हक्काची, शेतकऱ्याला भूमिहीन करू नका, देशोधडीला लावू नका ! अशा घोषणांनी ही संपूर्ण गावे दणाणून गेली आहे. यामध्ये अंत्री खेडेकर, पांढरदेव, टाकरखेड, करतवाडी यासह ४६ गावांमधील गावकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती खेडेकर यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात येत आहे.
मागणी नसताना मार्ग
दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ज्योती खेडेकर यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना आपली भूमिका आणि विरोधाची कारण मीमांसा केली. राजकीय पक्ष किंवा भाविक नागरिक यांनी अजिबात मागणी केली नसतानाही सिंदखेडराजा ते शेगाव या मार्गाचा शासनाने निर्णय जाहीर केला. याला भक्तिमार्ग असे गोंडस नाव देण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेर असलेले सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव दरम्यान किमान तीन चांगले आणि सुस्थितीतीतील मार्ग उपालब्ध आहे. असे असताना या मार्गाची मुळात आवश्यकताच नाही. चार तालुक्यांतून हा भक्तिमार्ग प्रस्तावित आहे. यासाठी लागणारी जमीन ही सुपीक शेत जमीन आहे. या सुपीक शेतजमिनीच्या किंमती लाखो रुपयांच्या घरात आहे. या शेतीवर शेकडो शेतकरी आणि त्यांच्या परिवाराचे उदरभरण आणि भवितव्य अवलंबून आहे. सिंदखेडराजा येथून संतनगरी शेगावला जाण्यासाठी इतर पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. उपलब्ध मार्ग चांगल्या स्थितीत आहे. कोणाचीच मागणी नसताना राज्य सरकार या महामार्गासाठी आग्रही का आहे? हे न उलगडणारे कोडे असल्याचे ज्योती खेडेकर यांनी सांगितले. यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आज ४६ गावांतील आबालवृद्ध गावकरी यात सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील महायुतीचे सरकार हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत वेळोवेळी आंदोलन करतच राहणार असा इशाराही खेडेकर यांनी चर्चे अंती दिला.
हेही वाचा – चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून ४० लाख लिटर पाण्याची चोरी, ड्रोन कॅमेऱ्यात…
आंदोलनकर्त्या महिलेला अश्रू अनावर!
आंदोलनादरम्यान एक शेतकरी महिला ढसाढसा रडली. शेतीवर आमचं घरदार चालते, तिच्या भरोशावर अख्खा भारत देश चालतो, तीच जमीन जर हातातून जात असेल तर आम्ही आता करायचं तरी काय? असा आर्त टाहो या महिलेने फोडला. यावेळी ज्योती खेडेकर आणि अन्य गावकऱ्यांनी समजूत घालून त्या माउलीला दिलासा दिला.