बुलढाणा: सध्या राज्यभरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात पिचल्या जात आहे. अशातच आता राष्ट्रीयकृत बँका देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. या बँकांनी पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा लावला आहे. खाते होल्ड केल्या जात आहेत.हे प्रकार थांबवा अन्यथा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी देखील तुपकरांनी केली आहे.यावर्षी खरिपात पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट झाली तर रब्बी मध्ये अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोणत्याच शेतमालाला भाव नाही. भाव नसल्याने जिल्ह्यात ५०% पेक्षा जास्त शेतमाल हा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

अशातच आता येणारे पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या या रकमांना होल्ड लावत आहे. चहुबाजूने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बँक अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पिकविमा व अनुदानाच्या जमा होणाऱ्या रकमांना परस्पर होल्ड लाऊ नये, किंवा सदर रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करू नये, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.जर बँकांकडून असेच चालू राहिले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहतील.त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी, राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने करावी,अन्यथा संघर्ष होईल, असा कडक इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

या मागणीचे निवेदन रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांचे पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे परस्पर कर्ज खात्यात वळती केल्यास संबंधित बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करून बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवल्या जाईल असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.