बुलढाणा : तालुक्यातील रायपूर सैलानी येथील सैलानी बाबा म्हणजे जिल्ह्यातील लाखो हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान. लाखो भाविकांना पावणारे सैलानी बाबा यंदा ‘लालपरी’लाही भरभरून पावले!
मागील शेकडो वर्षांपासून दरवर्षी होळीच्या आसपास सैलानी बाबांची महायात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक यानिमित्त सैलानीत डेरेदाखल होतात. मुख्य दिवस असलेल्या संदलच्या दिवशी लाखावर भाविक जमतात. यंदा १३ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ही यात्रा पार पडली. एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाने विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनात यात्रेसाठी जय्यत नियोजन केले. भाविकांची ने-आण करण्यासाठी ६१६ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. यापैकी १५७ बस मुक्कामी होत्या. या बसगाड्यांनी तब्बल ३३६९ फेऱ्या करून व १ लाख ४९ हजार ९७८ किलोमीटर अंतर कापून १ लाख ५६ हजार २८८ प्रवाशांना सैलानी बाबांचे दर्शन घडविले. यातून विभागाला ९७ लाख ५३ हजार २६६ रुपयांचा उत्पन्नरूपी प्रसाद मिळाला.
हेही वाचा >>>तब्बल ४५ वर्षानंतर नागपूरला मिळाले ‘या’ स्पर्धेचे यजमानपद, ऑलिम्पिक पात्रतेसाठी….
लोकसभा निवडणुकीत कोणाला ‘विजयदान?’
लालपरीला बाबांचा भरभरून आशीर्वाद मिळाला, आता लोकसभेत ते कोणत्या उमेदवाराला पावतात, असा मजेदार प्रश्न चर्चेत आहे. युतीचे प्रतापराव जाधव यांना की आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना विजयाचा आशीर्वाद देतात. अपक्ष रविकांत तुपकर यांच्या रूपाने बाबा काही ‘चमत्कार’ घडवितात, हे ४ जूनलाच कळणार आहे.