वर्धा: समृद्धी मार्गावर सिंदखेडराजा परिसरात १ जुलै रोजी झालेल्या भयावह अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यास आता चार महिने लोटत आहे. त्यावेळी शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना काही आश्वासने दिली होती. मात्र, ती आश्वासने पूर्ण करण्यात शासन फोल ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मृताच्या कुटुंबास २५ लाख रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यापैकी पाच लाख रुपये व केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयेच मिळाले असल्याचे निदर्शनास आणण्यात येते. विदर्भ ट्रॅव्हल्सवर दोषारोपपत्र दाखल झाले नाही. ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द झालेली नाही.
हेही वाचा… राज्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात तापमानवाढ
तपासी अधिकाऱ्यांनी अद्याप कुटुंबाशी संवाद केला नाही. अशा व अन्य बाबी मांडण्यात आल्या. तत्पर कारवाई न झाल्यास दिवाळीनंतर साखळी उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
असं असलं तरी सरकारने दिलेल्या माहितीनुसार २५ लाख नाही तर ५ लाखांचीच मदत जाहीर करण्यात आली होती जी आता पूर्णपणे संबंधितांना देण्यात आली आहे.