बुलढाणा : राजश्री शाहू मल्टिस्टेट पतसंस्थेचे सर्वेसर्वा तथा वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबईस्थित ‘मातोश्री’ येथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हाती ‘मशाल’ घेतली. बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील उदयोन्मुख नेतृत्व, अशी संदीप शेळके यांची ओळख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सचिव खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, आदी उपस्थित होते.

हेही वाचा – यवतमाळ : घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; जिल्ह्यात पावसाची संततधार

पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले शेळके?

कोणत्याही अटी-शर्तीशिवाय शिवसेनेत प्रवेश केल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. व्यापक समाज सेवा करण्यासाठी राजकीय पक्षाचे पाठबळ लागते, हे लक्षात घेता आपण आपल्या ‘आवडीच्या पक्षात’ प्रवेश केला आहे. भविष्यात राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घ्यायचाच होता, तो आज घेतला एवढंच,’ अशी मार्मिक व संक्षिप्त प्रतिक्रिया शेळके यांनी दिली.

…यामुळे धरली ‘मातोश्री’ची वाट!

सहकार क्षेत्राला विविध उपक्रमाची जोड देणारे संदीप शेळके यांनी ‘वन बुलढाणा मिशन’च्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक क्षेत्रात काम सुरू केले. विविध सामाजिक उपक्रम राबविले. आपली राजकीय महत्वाकांक्षा कधीच लपवून न ठेवणाऱ्या संदीप शेळके यांनी नुकत्याच पार पडलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत दिली. मात्र त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे नाउमेद न होता त्यांनी सामाजिक उपक्रम राबविणे सुरूच ठेवले. स्वबळावर निवडणूक लढणे किती कठीण असते हे वेळीच लक्षात आल्याने संदीप शेळके यांनी विधानसभा डोक्यात ठेऊन हा प्रवेश केला. जिल्हा प्रमुख बुधवत यांच्याशिवाय प्रबळ उमेदवारीचा दावेदार, प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांनी मातोश्रीची वाट धरली असावी, अशी चर्चा आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना त्यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. आपण विनाअट प्रवेश केल्याचे ते सांगत असले तरी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचा अंदाज आहे.

दिराच्या माध्यमातून वहिनींना प्रतिशह!

१९९० पासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा एकत्रित शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील लढतीतही एकसंघ सेनेनेच येथे बाजी मारली होती. सेनेतील उभ्या फूटनंतरही उद्धव ठाकरे बुलढाणा विधानसभेसाठी आग्रही आहे. यामुळे बुलढाणा विधानसभा हासुद्धा त्यांचा हेतू असू शकतो. मात्र या पक्ष प्रवेशाला अनेक कांगोरे आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत हे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातील मोठे दावेदार आहेत. मात्र, आज शेळकेंच्या पक्ष प्रवेशाला ते आपल्या समर्थकांसह हजर होते. दुसरीकडे, जालिंदर बुधवत यांच्या विरोधातही उबाठामधील एका गटाने उचल खाल्ली आहे. अकोला येथे पार पडलेल्या विभागीय बैठकीत या गटाने संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला होता, हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूरला काय मिळाले? मेट्रोला निधी, नागनदीचे पुनरुज्जीवन आणि बरेच काही

यामुळे या प्रवेशामागे अनेक डावपेच, छुपे राजकीय हेतू असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे. याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जयश्री शेळके यांनी तयारी चालविली आहे. काँग्रेसला सुटली तर काँग्रेस आणि ठाकरे गटाला सुटली तर शिवबंधन बांधून पंज्यात ‘मशाल’ घेण्याची जयश्री शेळके यांचे उघड मनसुबे आहेत. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके या संदीप शेळके यांच्या सख्ख्या भावजयी आहेत. त्यामुळे तुलनेने कमी राजकीय अनुभव असलेल्या दिराला प्रवेश करवून देत जयश्री शेळके यांना वेळीच ‘थोपवण्याचे’ डावपेच यामागे असण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसमध्येही जयश्री शेळकेंना उघड विरोध करणारे दोन गट आहेत. त्यामुळे ‘ताईंची’ राजकीय कोंडी करण्याचा ‘गेम’ देखील यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताई समर्थक म्हणतात…

‘ताईंच्या’ गोटातून या पक्षप्रवेशासंदर्भात मजेदार प्रतिक्रिया आली आहे. ‘दादांचा (संदीप शेळके यांचा) पक्षप्रवेश साधी राजकीय बाब आहे. त्यांना कुठल्यातरी राजकीय पक्षात जायचेच होते, त्यांनी उबाठाची निवड केली. हे तर जयश्री ताईंसाठी विधानसभेत पूरक ठरणारी बाब आहे, असा दावा समर्थकांनी केला आहे.