बुलढाणा : सजलेले गजानन महाराज मंदिर, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या लाखांवर आबालवृद्ध भाविकांचा मेळा, शेकडो दिंड्या सोबत आलेले हजारो वारकरी, टाळ मृदंगाच्या तालावर होणारा ‘गण गण गणात बोते’ चा गजर, रात्रभर खुले असूनही दर्शनासाठी लागलेल्या दीर्घ रांगा अन भक्तिरसात चिंब भिजलेली, गजबजलेली संत नगरी…
विदर्भ पंढरी म्हणून भारत वर्षातच नव्हे तर साता समुद्र पल्याड ख्याती गेलेल्या शेगाव नगरीमध्ये आज रविवारी असा माहौल आहे. याला कारणही तसेच खास आहे. आज रविवारी गजानन महाराजांचा १४६ प्रगट दिन आहे. ब्रिटिश राजवटीत २३ फेब्रुवारी १८७८ रोजी एक अवलिया महापुरुष शेगाव नगरीत प्रगटला! श्रुंग ऋषींनी वसविले म्हणून आधी शृंगगाव, पुरातन शिवालय मुळे शिवगाव आणि नंतर शेगाव असे नामकरण होत गेलेल्या या नगरीत महाराज प्रगटले! दासगणू महाराज रचित विजय ग्रंथात याचे ऐन तारुण्याभीतरीं, गजानन आले शेगावनगरी; शकेअठराशेभीतरीं, माघ वध्य सप्तमी असे करण्यात आले.
हेही वाचा : भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क
याला पाहतापाहता १४६ वर्षे लोटली. महाराजांनी सन १९१० मध्ये ऋषी पंचमीला घेतलेल्या संजीवन समाधीला अनेक वर्षे लोटली. मात्र ‘महाराज निरंतर शेगावी वास करून आहेत, संकटमुक्त करून इच्छापूर्ती करतात’ हा विश्वास व श्रद्धा पिढ्यानपिढ्या अढळ आहे. यामुळे शेगावी भाविकांचा ओघ कायम आहे आणि दिनविशेष प्रसंगी होणारी लाखांची मांदियाळी कायम आहे.
हेही वाचा : नागपूर : पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारण काय? वाचा सविस्तर…
आज, ४ मार्चला साजरा होणारा १४६ वा प्रगट दिन देखील याला अपवाद नाही. गजानन महाराज मंदिर अन संपूर्ण नगरी भाविकांनी नुसती फुलून गेली आहे. पायदळ वारी, दिंड्या ते विविध वाहनांनी नगरीत दाखल होणाऱ्या भाविकांनी काल संध्याकाळ पर्यंत शेगाव गाठले. रात्री व आज सकाळ पर्यंत हे आगमन सुरूच राहिले. यामुळे आज संतनगरीत लाखांवर भाविक दाखल झाले आहे. २ मार्चला दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले होते. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झालीच पण संस्थान व सेवेकरी यांच्यावरील ताण कमी झाला. याउप्परही आज रविवारी मंदिरात पहाटे पासून लागलेल्या भाविकांच्या रांगा कायम आहे. प्रत्यक्ष व मुख दर्शनासाठीही भाविकांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे.