बुलढाणा: संत गजानन महाराज संस्थानच्या मुख्य उत्सवापैकी एक असलेल्या श्रीरामनवमी निमित्त रविवारी विदर्भ पंढरी शेगावात लाखावार भाविकांची मांदियाळी जमली आहे. विदर्भासह राज्यभरातील कमी अधिक पायदळ दिंड्या देखील शनिवारी रात्री पर्यंत डेरे दाखल झाल्या आहे. गजानन महाराज समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी हजारो आबालवृद्ध भाविकांच्या रांगा लागल्या. जय श्रीराम आणि गण गण गणात बोते च्या जयघोषाने आसमन्त दुमुमला असून संपूर्ण मार्ग भाविकानी फुलून गेले आहेत. यामुळे रणरणत्या उन्हातही संत नगरी भक्ती रसात चिंब झाल्याचे चित्र या पवित्र नगरीत निर्माण झाले आहे…

संत नगरी शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १३१ वा श्रीराम नवमी उत्सव सोहळा रविवार ६  एप्रिल  रोजी भक्तिमय व मंगलमय वातावरणात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी संत नगरी नटल्याचे दिसून आले. श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसर केळीचे खांब, आंब्याची तोरणे, भगव्या पताका आणि ध्वजानी शुशोभीत करण्यात आला आहे.श्रीराम जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातून श्रीराम नवमी उत्सवासाठी ६५० च्या आसपास भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या होत्या. भजनी दिंड्या येण्याचा ओघ संतनगरीत आज रविवारी, ६ एप्रिलला देखील सुरूच होता. हरे रामा हरे रामा रामा हरे हरे,हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे श्रीराम जय राम जय जय राम, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते मंत्राचा नाम घोष करीत भजनी दिंड्या टाळ मृदंगाच्या निनादात संतनगरीत दाखल झाल्या.

यज्ञाची सांगता

यापूर्वी श्रींच्या मंदिरात १३१ वा श्रीराम नवमी उत्सवाला गुढीपाडवा ३० मार्च रविवार पासून प्रारंभ झाला. त्या अनुषंगाने श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . यामध्ये दररोज मंदिरामध्ये काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन आदि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले .

श्रीराम नवमी उत्सवादरम्यान आध्यात्म रामायण स्वाहाकारास  यज्ञाला २ एप्रिल बुधवार ला आरंभ होऊन आज रविवार ६ एप्रिल श्रीराम नवमी दिनी सकाळी १० वाजता यज्ञाची पूर्णाहुती व अवभृतस्नान झाले . त्यानंतर सकाळी १० ते १२ यादरम्यान ह.भ.प  श्रीराम बुवा ठाकूर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाले . दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुलाल पुष्पांची उधळण करत सनई चौघडांच्या मंगलमय वातावरणात व टाळ मृदंगाच्या निनादात भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

नगर परिक्रमा

श्रींच्या मंदिर परिसरातून दुपारी श्रीराम नवमी उत्सवा निमित्त श्रींची पालखी रथ ,अश्वासह , पताकाधारी टाळकरी व वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात पालखी परिक्रमाकरिता निघणार आहे .सायंकाळी श्रींची पालखी श्रींच्या मंदिरात नगर परिक्रमा करून पोहोचेल व आरती होईल.श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालय जवळील उत्तर द्वारातून, महात्मा फुले बँके समोरुन, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भिम नगर (तिन पुतळा परिसर), शाळा नं. २ (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरुन), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. ६.०० वाजताचे आसपास परत येईल.

दर्शनासाठी एकेरीमार्ग

श्रींचे  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचे पारायण मंडप, श्रींची गादी पलंग, दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहाटे दर्शनसाठी दीड तास लागत होते. दुपार पर्यंत याला तीन तास लागत होते. शनिवारी रात्रभर मंदिर दर्शनसाठी उघडे असतानाही दर्शनाला अडीच ते तीन तास लागत आहे. आज रविवारी देखील रात्री मंदिर सुरूच राहणार आहे.

उत्सवांची सांगता

श्रीराम नवमी उत्सवाची सांगता ७ एप्रिल सोमवार ला होणार आहे.   ह भ प प्रमोद बुवा राहणे यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे किर्तन व गोपालकाला होऊन उत्सवाची सांगता होईल.