बुलढाणा: समृद्धी महामार्गावर छत्तीसगड राज्यातील खासगी बस भरवेगात उलटली. सुदैवाने यात प्राणहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहे. आज ५ जूनला डोणगाव (तालुका मेहकर) नजीक ही दुर्घटना घडली.
छत्तीसगड येथून पुण्याकडे जाणारी (सीजी.०९ जे. आर. ७००२ क्रमांकाची) खाजगी बस आज डोणगाव जवळ पोहोचली. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने बस उलटली. बसमध्ये जवळपास ५६ प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहे. देवसिंग धुर्वे व राजबब्बर, (रा.कबीरधाम) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील रुग्णवाहिकेतून जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. घटनेचा तपास डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.
दरम्यान सुमारे दीड वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र सतत होणाऱ्या वाहन अपघातामुळे हा मार्ग कायम चर्चेत राहतो. होणाऱ्या अपघातात चालकाला पहाटे, सकाळी वा उत्तररात्री डुलकी लागल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नाही किंवा झोप न झाल्याने हे अपघात होतात. याशिवाय महामार्ग संमोहनमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देखील लक्षणीय आहे.