बुलढाणा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ‘स्कॉर्पिओ’ उलटली. या दुर्घटनेत एक प्रवासी ठार तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज, रविवारी हा अपघात घडला. चौघा गंभीर जखमींवर खामगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले आहे.
खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी ते बोरी – अडगाव रोडवर सकाळी ही दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार (एम एच ३३.ए सी. २३६६ क्रमाकांचे) स्काॅर्पिओ वाहन विदर्भपंढरी शेगावकडे जात होते. भरधाव वेगामुळे वाहन चालकाचे वाहनावरील अचानक नियंत्रण सुटले. यामुळे हे वाहन गाडी आंबेटाकळी ते बोरी – अडगाव रोडवर उलटल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आंबे टाकळी, बोरी अडगाव परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर खामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या अपघातातील जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा – ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…
या अपघातात देवराव रावजी भंडारकर (५५ रा. गडचिरोली) हे जागीच ठार झाले आहेत. यासह वाहनामधील कांता देवराव भंडारकर (५०), जयदेव नामदेव नाकाडू (४०), जयश्री राऊत (१६), समृद्धी कोमलवार (६) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जखमींवर खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा – “मला कोणाची रसद घेण्याची गरज नाही”, ठाकरेंचा राऊत यांना टोला
घटनेतील मृत व चार जखमी गडचिरोली जिल्ह्यातील तळेगाव येथील राहिवासी आहेत. या अपघाताची माहिती येऊन धडकताच गावात एकच खळबळ उडाली. भंडारकर परिवरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेगाव येथे दर्शनासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, शेगाव नगरी सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असताना त्यांना घेऊन जाणारे वाहन अचानक उलटले. त्यामुळे दर्शनाचा त्यांचा बेत हुकला आणि भलतेच होऊन बसले. चालकाला डुलकी लागून वाहन अनियंत्रित झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.