बुलढाणा : ग्रामदैवत रेणुका मातेच्या यात्रेची तयारी सुरू असलेल्या चिखली नगरीत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पवित्रमय आणि उत्साही वातावरण असलेल्या चिखली परिसरात शोककळा पसरली. चिखली शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूल (जलतरण तलाव)मध्ये दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. आज गुरुवार, १० एप्रिलच्या सायंकाळी सात वाजता ही दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली.

चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात एका बाजूला स्विमिंग पूल आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या स्विमिंग पूलवर सकाळ व संध्याकाळी पोहणाऱ्यांची संख्या जास्त असते. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन विद्यार्थी स्विमिंग करीत असताना बुडाले. दोघेही खासगी शिक्षण संस्थेच्या बीएमएस महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होते, अशी माहिती आहे.

मृतांपैकी एकाचे नाव विवेक वायले असून तो अकोला जिल्ह्यातील पाथर्डीचा (ता. अकोट) रहिवासी होता, तर दुसऱ्याचे नाव सुरेश पारखेडे असे असून तो गेवराई बीडचा म्हणजे मराठवाड्यातील रहिवासी होता. दोघे बावीस वर्षांचे आहेत.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली. दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल परिसरत असलेल्या नजीकच्या भराड रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली.