बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळाला हादरविणारी धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला आणि गुरूंचा दर्जा असलेल्या शिक्षकांच्या विकृतीची बाब समोर आणणारी घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे.
येथील एका खाजगी शाळेतील दोन शिक्षकांनी एका मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे, गुण वाढविण्याचे आमिष दाखवून मुलाच्या आईवर शारीरिक अत्याचार केले. यानंतर वेळोवेळी धमाकावत, आई लेकाला ठार करण्याची धमकी देत तिच्या शरीराचे लचके तोडले.
हा घृणास्पद प्रकार असह्य झाल्याने ३४ वर्ष्रीय महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा नुसार गुन्हे दाखल केले आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
मोताळा तालुक्यातील रहिवासी असलेली ही ३४ वर्षीय महिला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मलकापूर येथे राहवयास आली होती. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी समाधान इंगळे (वय ४५, राहणार मलकापूर) व अनिल थाटे (वय ४७ मलकापूर) या दोघा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
यातील इंगळे हा पीडितेच्या मुलाचा वर्ग शिक्षक आहे. दुसरा आरोपी त्याच शाळेत आहे. यामुळे पीडिता व आरोपी यांची ओळख झाली, फोनवरून बोलणे सुरु झाले. चांगुलपणाचा आव आणणाऱ्या या शिक्षकांनी “तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ व पहिला नंबर आणू, त्यासाठी तू आम्हाला खुश कर” अशा प्रकारे मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
या आरोपींनी पीडितेला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. वेळोवेळी तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. यामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचून गेली. अखेर तिने धैर्य करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा घृणास्पद घटनाक्रम सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत मलकापूर येथे घडला. पोलीसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ (२) (एम), ७०(१), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. कौळासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.