बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ १५ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जुनअखेर पुरेल एवढाच जलसाठा असल्याने पाऊस वेळेवर येणे काळाची गरज ठरली आहे.
मागील काळात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. तळपत्या उन्हाने जलाशयातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. येळगाव धरणाचीही अशीच बिकट स्थिती आहे. धरणाची जलसाठा क्षमता १२.४० दशलक्ष घनमीटर आहे. आजघडीला धरणात केवळ १.९० दशलक्ष घनमीटर (१५ टक्के) इतकाच जिवंत जलसाठा आहे. याशिवाय १५ टक्के मृत जलसाठा शिल्लक असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. हा साठा ३० जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. यामुळे जूनमध्ये चांगला पाऊस होणे आणि तोही पैनगंगा नदी परिसरात होणे आवश्यक आहे. अन्यथा बुलढाणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : जोगन्नाचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या जिव्हारी; ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन
जिल्हाधिकारी व बुलढाणा पालिका प्रशासन या परिस्थितावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने केल्या जात आहे. अपुरा जलसाठा लक्षात घेऊन बुलढाणा शहराला सध्या सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पश्चिम विदर्भात टँकर फेऱ्यांमध्ये वाढ
पश्चिम विदर्भातील (अमरावती विभाग) ७१ गावांमध्ये ७५ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना का होऊ शकल्या नाहीत, अशा प्रश्न आता चर्चेत आला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. अमरावती विभागात गेल्या पाच वर्षांमध्ये या कार्यक्रमावर सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तरी पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. रविवारी प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात ५७ गावांमध्ये ५८ टँकर, अमरावती जिल्ह्यात ८ गावांमध्ये ११ टँकर तर यवतमाळ जिल्ह्यात ६ गावांमध्ये ६ टँकर लागले आहेत. अकोला आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले, तरी येत्या काही दिवसांत टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे.
हेही वाचा : गोंदिया : नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शोधा अन् ११०० रूपये मिळवा, जिल्हा युवा सेनेचे….
बुलढाणा जिल्ह्यात यंदा डिसेंबर २०२३ अखेरीस दोन टँकर सुरू होते. नंतर, त्यात झपाट्याने वाढ होत गेली. सध्या ५ तालुक्यातील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांची तहान टँकरने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठाद्वारे भागवली जात आहे. याशिवाय ८ तालुक्यातील १३६ गावांना १६८ अधिग्रहीत खासगी विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरांना कुठून पुरवायचे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. अनेक भागांतील विहिरी, नद्या, नाले आटले असून तलावांनीही तळ गाठला आहे. धरणांमधील साठाही झपाट्याने कमी होत आहे.