बुलढाणा: समाज माध्यमांच्या दुरुपयोग, त्यामाध्यमाने होणारे अपराध यावर नेहमी चर्चा रंगते, तश्या बातम्या वाचण्यात येतात. मात्र याच ‘सोशल मीडिया’ चा सदुपयोग केला तर काय सुखद होऊ शकते याचा प्रत्यय मुंबईतील शेकडो बुलढाणेकरानी आणून दिला आहे. मुंबईमध्ये नोकरी व कामानिमित्त स्थिरावलेल्यांची संख्या मोठी आहे. मात्र संवाद नसल्याने ते एकमेकांना ओळखत नाही. मोठया गावात आपल्या जिल्ह्याचा माणूस भेटणे याचा वेगळाच आनंद आहे. तो आपल्या सुखा दुःखाचा साथीदार बनू शकतो. यासाठी शेषराव सुसर यांनी पुढाकार घेतला.
बुलढाणा जिल्ह्यातील विवीध गावातून मुंबई मध्ये नोकरी, कामाकरीता आलेल्याची माहिती घेऊन सुसर यांनी, “मुंबईतील बुलढाणेकर” हा व्हाट्सएप ग्रुप तयार केला. सर्व जाती, धर्माचे बुलढाणेकरांना ग्रुप मध्ये जोडलं. पाहतापहाता या ग्रुपचे तब्बल ४३४ सदस्य झाले. त्यांच्या माध्यमाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांची कुटुंबे जोडल्या गेली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. महानगरी मधील एकाकीपण दूर झाले. काही समाजबांधव, दूरचे नातेवाईक निघाले. यामुळे ग्रुप च्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून जिल्हा वासी एकवटत आहे.
आणि… ‘गेट टूगेदर’
भारत स्काऊटस् आणि गाईडस् ठाणे चे जिल्हा संघटन आयुक्त किरण लहाने यांनी ग्रुपचे सदस्यांचा परिवारासह ‘गेट टूगेदर’ ठेवण्याची संकल्पना मांडली. बदलापूर तालुक्यातील कोंडेश्वर तिर्थस्थळ या निसर्गरम्य ठिकाणी ही सहल काढण्यात आली. या सहलीत ३५ कुटुंब आनंदाने सहभागी झाले.