वर्धा : बैलगाडा शर्यतींवर लावण्यात आलेली बंदी उठल्यानंतर लगेच गावगाड्यात उत्साह संचारला. माजी आमदार अमर काळे यांनी पुढाकार घेत तळेगावला शंकरपटाचे आयोजन केले.
माजी मंत्री सुनील केदार व यशोमती ठाकूर यांनी झेंडी दिल्यानंतर पहिला बैलगाडा धावला तो चिमुकल्या गौरीचा. कृषक प्राथमिक शाळेच्या पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या गौरी सुरेंद्र मोरेने वाडवडिलांची परंपरा पुढे नेत जोडीचा कासरा सैल करीत भिरर केले. तिचे धाडस टाळ्या घेणारे ठरले. तिला विशेष पुरस्कार बहाल झाला.
हेही वाचा – ‘कुनो’तील चित्ते घेणार मोकळा श्वास, पण…
या शंकरपटात मध्यप्रदेशसह विदर्भातील शंभरावर जोड्या स्पर्धेत उतरल्या होत्या. शिवणी जिल्ह्यातील असिर पटेल यांच्या चपरी – डोंगरिया या जोडीला अ गटात तर ब गटात वाशीमच्या आतिष वर्मा यांच्या राणा सुलतान जोडीला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
हेही वाचा – एका सुंदर सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व; भारतीय संशोधकांचाही मोलाचा वाटा
गाव गटात तळेगाव येथील महेंद्र मोरे यांच्या राज रुबाब या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. एकूण २८ जोड्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चरण खरासे व अथर्व बैसे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. अमर काळे यांनी पुरस्कार प्रदान केले.