लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर टीका केली म्हणून मध्य नागपूरचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण त्यानंतरही शेळके शांत बसले नाही. रविवारी त्यांनी पुन्हा पटोलेंवर तोफ डागली. त्यांनी पुन्हा पटोलेंवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप केला.

पत्रकारांशी बोलताना शेळके म्हणाले, प्रदेश काँग्रेसच्या नोटीसला मी उत्तर देईल.त्यांनी नोटीसच पत्र प्रसार माध्यमांमध्ये दिले त्यामुळे मला प्रसार माध्यमांकडे येऊन मला माझे म्हणणे मांडावे लागत आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.

पटोले यांनी विदर्भासह महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्याचे खच्चीकरण केले. त्यांच्या कारनाम्यांचे पुरावे राहुल गांधी यांच्याकडे देणार. विधानसभा निवडणुकीच्या काळात संघाचे एजंट म्हणून त्यांनी भाजपला मदत केली असल्याचा आरोपशेळके यांनी केला. मध्य नागपुरात संघाचे मुख्यालय असल्यामुळे ही जागा काँग्रेसने जिंकू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. येथील पक्ष संघटना कमजोर केली आणि मला कुठलीही मदत केली नाही, असे शेळके म्हणाले. पक्षाने मला नोटीस बजावली असली तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. नाना पटोले आमचे नेते नाही तर राहुल गांधी आमच्यासाठी नेते आहे आणि त्याचा मी शिपाई आहे.

आणखी वाचा-धाड दंगल : ३३ विरुद्ध गुन्हे दाखल; १७ अटकेत, दोन पोलीसासह अनेक नागरिक जखमी

नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरीच्या सिमेवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या विरोधात आंदोलन केले. मला आंदोलनाची परवानगी देऊ नका, असे सांगत पटोले यांच्या सांगण्यावरुन उलट माझ्यावर हल्ला करण्यात आला. त्यावर एकही शब्द पटोले बोलले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असल्यामुळे ते संघाचे एजंट म्हणून काम करतात, असे मला वाटते.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश कार्यालयातून माझे नाव उमेदवाराच्या यादीत टाकण्यात आले नाही. राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली आहे. प्रियंका गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या असताना तिथे काँग्रेसने कुठलीही ताकद लावली नाही. मतदानाच्या दिवशी माझ्यावर कारवाई झाली, तेव्हा काँग्रेसचे कायदेविषयक सेल कुठे होता. त्यावेळी पटोले काही बोलले नाही. असे शेळके म्हणाले.

उमेदवारीसाठी २० लाखाची मागणी

नाना पटोले यांनी इरफान काजी नामक व्यक्तीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप शेळके यांनी केला. भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांनी त्याला ते पैसे उपलब्ध करुन दिले होते. पैसे दिले तरच तुझी उमेदवारी पक्की आहे ,असे नाना पटोले त्याला सांगतात मात्र, त्या व्यक्तीने ते पैसे घेतले नाही. पटोले यांचे निवडणुकीच्या काळातील अनेक कारनामे असून येत्या काही दिवसात ते समोर आणणार आणि राहुल गांधी यांना पुराव्यासह देणार असल्याचे शेळके म्हणाले.

आणखी वाचा-अकोला : विदेशी ‘पाहुण्यां’ची अद्याप प्रतीक्षाच, ‘झुडुपी’ची हजेरी…

भाजपचे पटोलेना आव्हान

पाच वर्ष मतदारसंघाशी सबंध न ठेवता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ईव्हीएमला दोष देत आहे. पटोले यांना ईव्हीएमबाबत शंका असेल तर त्यांनी बॅलेटवर पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान भाजपाचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी पटोले यांना दिले.

ईव्हीएम कॅल्यूलेटर सारखी मशीन आहे, ती हॅक होऊ शकत नाही. त्यांना जनतेने नाकारले असल्याने आता ते ईव्हीएमला दोष देत आहे. नाना पटोले निष्क्रिय आहे, त्यांची कार्यपद्धती आणि वागणूकीमुळे कॉंग्रेस पक्षातील नेते नाराज होते, लोकसभेच्या तिकीट विकण्याचे आरोप पटोले यांच्यावर झाले असेही फुके म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bunty shelkes serious allegations against nana patole vmb 67 mrj