कामानिमित्त गडचिरोलीला गेलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) शिपायाच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून पाच लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन युवराज मेश्राम (३८) रा. रामजी आंबेडकर चौक, वाडी असे फिर्यादी जवानाचे नाव आहे.

सचिन हे सध्या गडचिरोली येथे तैनात असून त्यांची पत्नी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांना घर खरेदी करायचे आहे. खरेदीचे विक्रीपत्र करण्यासाठी त्यांनी पाच लाख ८० हजार रुपये जमवले व ते घरी ठेवले होते. काही दिवसांपूर्वी पत्नी नागपुरात आली होती. दरम्यान, तिची सुटी संपल्यानंतर  नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायचे असल्याने ते पत्नीसह गडचिरोलीला गेले. संधी साधून चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून कपाटातील पाच लाख ८० हजारांची रोख व दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज चोरी केला. दोन दिवसांपूर्वी सकाळी ही घटना उघडकीस आली. सचिन यांनी वाडी पोलिसांत तक्रार दिली. वाडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader