नागपूर : समृद्धी महामार्गावर ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या ज्या बसने २५ जणांचा बळी घेतला, ती बस यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे आहे. पूर्वी वाहतूक शाखेत कार्यरत या पोलीस अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे बस खरेदी करून प्रवाशी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रगती भास्कर दरणे असे बस मालकाचे नाव आहे. प्रगती हे संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. भास्कर दरणे हे यवतमाळ पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते पूर्वी वाहतूक शाखेत असताना ट्रॅव्हल्स पॉईंटवर कर्तव्य बजावत होते. त्यामुळे खासगी बस विकत घेऊन प्रवाशी वाहतूक व्यवसाय करण्याची त्यांना कल्पना सूचली. त्यांनी पत्नी प्रगती यांच्या नावावर (एमएच २९ बीई १८१९) बस विकत घेतली. विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांच्याकडे ती वाहतुकीसाठी दिली. त्यावेळी पोलीस दलात कार्यरत कर्मचाऱ्‍यांच्या खासगी बस लांब पल्ल्यावर धावत लाखोंचा व्यवसाय करीत असून पोलिसांचा या बसेसला आशीर्वाद असल्याची चर्चा दोन वर्षांपूर्वी झाली होती. ती अपघातग्रस्त खासगी बस २०२० मध्ये खरेदी करण्यात आली होती.

हेही वाचा – रेल्वे रुग्णालयात मृतदेह बघून नातेवाईकांनी घातला गोंधळ

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बस वर्षभर उभीच होती. बसच्या कागदपत्रांसह फिटनेस प्रमाणपत्रही असल्याचे त्यांचा दावा आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरवरून निघाल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर सिंधखेड राजा येथे अपघात झाला. ही बस जळून खाक झाली आणि तब्बल २५ प्रवाशांचा बळी त्या बसने घेतला. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या या बसची पीयूसीसुद्धा संपलेली होती, अशी धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus of vidarbha travels which killed 25 people on the samridha highway is in the name of the wife of a police officer of yavatmal district adk 83 ssb
Show comments