वाशिम : जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेमुळे जालना, संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या अनेक बस फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे वाशिम आगाराला दररोज अंदाजे दोन लाख रुपयांचा प्रत्यक्ष तोटा सहन करावा लागत आहे.
वाशिम आगारातून दररोज जालना, संभाजीनगर मार्गे अनेक बस फेऱ्या धावतात. मात्र जालना येथील लाठीचार्जच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी अचानक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – कॉमिक बुकच्या माध्यमातून मिळणार मुलांना रंजक शिक्षण
वाशिम आगारातून धावणाऱ्या वाशिम ते शिर्डी, वाशिम पुणे, वाशिम नाशिक, वाशिम सिल्लोड, वाशिम सिडको यासह अनेक बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाशिम आगाराला दररोज अंदाजे प्रत्यक्ष दोन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून सवलतीसह अंदाजे चार लाख रुपये तोट्याची झळ सोसावी लागत आहे.
हेही वाचा – “पवार, ठाकरे यांनीच मराठा आरक्षणाला…” चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इतिहास’ सांगितला
अचानक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक बस गाड्या उभ्या आहेत. त्यामुळे बस सेवा कधी सुरू होणार हे अद्याप सांगणे कठीण असल्यामुळे सामान्य प्रवाश्याची कोंडी होत आहे.