देवेंद्र गावंडे
विज्ञान प्रगतीच्या दिशेने नेते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे. माफक शिक्षण घेतलेल्या कुणालाही समजेल अशी ही गोष्ट. अलीकडे याचा विसर पडू लागला की काय अशी शंका उत्पन्न करणारी स्थिती उद्भवलीय. नागपुरात एकीकडे विज्ञानाचा जागर चेतवणारी सायन्स काँग्रेस सुरू असताना रेशीमबागेच्या मैदानावर एका ढोंगी बाबाच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे, सकल हिंदूच्या एकत्रीकरणाचा नारा देत विदर्भात ठिकठिकाणी काढले गेलेल्या मोर्चात अंधश्रद्धेला, धार्मिक द्वेषाला खतपाणी घालणारी भाषणे होणे. या साऱ्या घटना हेच दर्शवतात. सध्याचा काळ प्रतिगामीत्व भूषण म्हणून मिरवण्याचा. असली लक्षणे खरे तर मागासपणाचे निदर्शक. आगामी भयसूचक संकटांची नांदी देणारी. त्यावर मात करून समाजाची पावले प्रगतीच्या दिशेने पडायला हवी ही प्रत्येक सुजाण नागरिकांची इच्छा. अशांसाठी विज्ञान महासभा ही चांगली संधी होती. मात्र तिथेही रूढी, परंपरांचा उदोउदो होताना बघणे जेवढे क्लेशदायक तेवढेच रेशीमबागला ढोंगी बाबासाठी झालेली गर्दी बघणे सुद्धा वेदनादायी. या दोन्ही आयोजनाचा एकमेकांशी काही संबंध नाही असे कुणाला वाटत असेल तर ते चूक. सनदशीर मार्गाने प्रशासकीय व्यवस्थेवर नियंत्रण मिळवणाऱ्या उजव्यांनी मोठ्या थाटात विज्ञान महासभेचे आयोजन केले. सरकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून ती त्यांची जबाबदारी होतीच. मात्र ती पार पाडताना हळदीकुंकू व रांगोळीच्या श्रद्धेचे महात्म्य त्यात दिसेल याची काळजी घेतली गेली. हा प्रकार या विचारसरणीच्या बुरसटलेपणाची जाणीव करून देणारा. दुसरीकडे रेशीमबागेत झालेला ढोंगी साधूचा कार्यक्रम तर भाजपचे आमदार मोहन मतेंनीच आयोजित केलेला. त्यामुळे या दोन्हीचे आयोजन एकाचवेळी होणे हा योगायोग कसा समजायचा?
एकीकडे सरकारी उपक्रमातही या उजव्यांना मूळ वृत्ती लपवता आली नाही तर दुसरीकडे पूर्णपणे सार्वजनिक असलेल्या साधूंच्या कार्यक्रमात या अंधश्रद्धेला बळ देणाऱ्या वृत्तीचे उघडपणे दर्शन घडवण्यात ही मंडळी यशस्वी झाली. सत्ता आली तरी मूळ विचार बदलत नाही व घटनादत्त विचाराची कास धरायला ही मंडळी तयार नाही याचेच हे द्योतक म्हणायचे. रेशीमबागेत आलेला हा साधू कोण? यापूर्वी कधीतरी त्याचे नाव तरी ऐकले आहे का? याविषयी अनेकजण अजूनही अनभिज्ञ असतील पण समाजाला गुंगीचे औषध पाजण्यात माहीर झालेले लोक मात्र असे साधू हेरतात. त्यांना जाणीवपूर्वक समोर आणतात. हा डाव अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. या साधूने रामकथा सांगण्यात काही गैर नाही. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग झाला. पण हाच इसम ‘अर्जी लगाओ’ सारखा कार्यक्रम उघडपणे करतो. गरजूच्या कागदाला हात लावला की काम झाले असे खोटे व मूर्खपणाचे दावे करतो. त्याच्या तक्रारी होतात तरी पोलीस काही करत नाही. याला घटना व कायद्यानुसार चालणारी व्यवस्था कसे म्हणायचे? एरवी नागपूरचे पोलीस एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही असे छाती फुगवून सांगत असतात मग अशा भविष्य सांगणाऱ्याला बेड्या का ठोकत नाहीत? नेमका इथेच सत्तेसमोर व्यवस्था शरण जाण्याचा मुद्दा उपस्थित होतो. सामान्य लोकांना अंधश्रद्धेचे विष पाजण्याचे काम सुद्धा कुणाकडून करवून घेतले जाते तर सामान्यातून वर आलेल्या व परिवारात सामील झालेल्या लोकप्रतिनिधीकडून. या साधूला येथे आणणारे नेते बहुजनांचे प्रतिनिधी म्हणून मिरवतात. त्यामुळे तिथे होणारी गर्दीही बहुजनांची. हा सारा प्रकार हा समाज कायम धर्म व अंधश्रद्धेच्या नशेत कसा राहील यासाठी योजला गेलेला. दुर्दैव हे की ही खेळी अनेकांच्या लक्षातच येत नाही.
अशा स्थितीत फुले, आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराजांचे उठसूठ नाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काम काय असते तर त्यांनी प्रबोधनाची जबाबदारी पार पाडावी. सध्या मोठ्या संख्येत एकाच विचाराची पालखी वाहणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी हा वसा केव्हाचाच सोडलाय. आता तेही परिवाराच्या सांगण्यावरून अशा साधूंना महत्त्व देऊ लागलेले. उपराजधानीचाच विचार केला तर झाडून साऱ्या नेत्यांनी या साधूच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यातले अनेक विज्ञान महासभेकडे फिरकले सुद्धा नाहीत. अशा लोकप्रतिनिधींकडून प्रबोधनाची अपेक्षा तरी कशी बाळगायची? अशा साधूंची प्रवचने आयोजित केली की लोकांची झुंबड उडते. मग तेच लोक आनंदाने मत देतात एवढाच मर्यादित विचार यामागे नाही. लोकांनी शिक्षण, रोजगाराची भाषा करूच नये, केवळ धार्मिक व अंधश्रद्धेत व्यस्त राहावे यासाठीच हे सर्व केले जाते. यातला दुसरा मुद्दा आहे तो विदर्भभर अतिशय नियोजनपूर्वक निघत असलेल्या मोर्चांचा. लव्ह जिहादला विरोध हा या मोर्चांचा मुख्य तोंडवळा. गंमत म्हणजे विदर्भात अशी कोणतीही घटना घडलेली नसताना हे मोर्चे काढले जात आहेत. त्यासाठी श्रद्धा वालकरचा हवाला दिला जातोय. या मुलीचा प्रियकर मुस्लीम नव्हता तर पारशी होता ही बाब जाणीवपूर्वक दडवली जातेय. यामागाचा उद्देश अगदी स्पष्ट व उघड आहे. किमान या जिहादच्या मुद्यावरून तरी हिंदूचे एकीकरण व्हावे हा! हे मोर्चे कोण काढत आहेत? त्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या संघटना कशा एका रात्रीत तयार झाल्या? त्यातले पदाधिकारी कोण? तेच पदाधिकारी सत्तारूढांच्या वर्तुळातही कसे वावरत असतात? या प्रत्येक मोर्चात येणाऱ्या साधू व महाराजांचा खर्च कोण करतो? त्यांचे बोलवते धनी कोण? परिवारातल्या सर्व संघटना यापासून जाणीवपूर्वक दूर का राहतात? नव्या संघटना व नव्या चेहऱ्यांना समोर करून हे मोर्चे का काढले जात आहेत? जुन्यांनी सकल धर्माचा नारा दिला तर जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही अशी भीती या परिवाराला वाटते का? या मोर्चामागचा हेतू हिंदूंना संघटित करून त्याचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हाच आहे का? धर्माच्या नावावर राजकीय पोळी शेकून घेणे योग्य व घटनेच्या चौकटीत बसणारे आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले की या विस्तृत खेळीचा पट एकेक करून उलगडत जातो.
दुर्दैव हे की सामान्यांना हे प्रश्नही पडत नाहीत. त्यामुळे ते उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अलीकडच्या काळात समाजातील बहुजनवर्ग या खेळीचा कायम शिकार ठरत आलेला. सत्ताधाऱ्यांना नेमके तेच हवे. सध्या पश्चिम विदर्भात असलेले हे मोर्चाचे लोण हळूहळू सर्वत्र पसरेल. जसजशा निवडणुका जवळ येतील तशी या मोर्चाच्या संख्येत वाढ होत जाईल. धर्मावरची श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी तो संकटात आहे असे भासवून साऱ्यांना एकत्र करण्याची ही खेळी निव्वळ राजकीय लाभासाठी आहे. हे वास्तव समाजाच्या ध्यानात येत नाही. धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणाऱ्या विरोधकांच्या लक्षात येते पण ते विरोध करण्याची ताकद हरवून बसलेले. हे ठाऊक असल्यानेच विज्ञान महासभा, साधूंचे जागरण व मोर्चांची रेलचेल विदर्भात सुरू झालीय.
devendra.gawande @expressindia.com