स्वस्त लॅपटॉप, संगणक देण्याच्या नावावर व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याची तक्रार करण्यात आल्यावर सायबर सेल पोलिसांनी संपूर्ण २.६१ लाखाची रक्कम परत मिळवून दिली. खदान येथील रहिवासी मुकेश वलेच्या यांचे संगणक विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांना एका ‘व्हाट्सॲप’ समुहावर संगणक व लॅपटॉप कमी भावात मिळत असल्याची जाहिरात दिसली. कमी किंमतीत मिळणार म्हणून त्यांनी संगणक, लॅपटॉप, लॅपटॉप बॅग आदी साहित्य ऑनलाईन मागवले. त्यासाठी त्यांनी दोन लाख ६१ हजार ४०० रुपये ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यामध्ये पाठवले.
हेही वाचा >>> ‘तो’ नव्हे ‘ती’! तब्बल ३८ वर्षांनंतर उघड झाले स्त्री असल्याचे रहस्य…
साहित्य प्राप्त न झाल्याने त्यांनी संबंधितांकडे विचारणा केल्यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याकडे ती तक्रार वर्ग करण्यात आली. सायबर पोलिसांनी ऑनलाइन व्यवहाराची तात्काळ माहिती घेऊन संबंधित बँकसोबत पत्रव्यवहार केला. ज्या खात्यात रक्कम पाठवली, ते खाते गोठविण्यात आले. या खात्यांमध्ये वेगवेगळी रक्कम गोठवण्यात आली. तकादारांची ऑनलाइन फसवणूक झालेली संपूर्ण दोन लाख ६१ हजार ४०० रुपयांची रक्कम तक्रारदारास मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय नाफडे, पोलीस अंमलदार गजानन केदारे, अतुल अजने यांनी केली.