सुमारे १०.३५ कोटीच्या करचुकवेगिरीच्या प्रकरणात नागपुरातील मेसर्स घाडगे ट्रेडर्सचे मालक धनंजय गाडगे यांना वस्तू व सेवा कर विभागाने अटक केली.
मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनलच्या करचुकवेगिरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना बोगस पुरवठादार व्यापाऱ्यांचे जाळे तयार करण्यात आल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे ८ बनावट फर्मस् तयार करण्यात आल्या होत्या. खोटी देयके जारी करून कर चोरी केली जात होती. अशाच एका प्रकरणात मेसर्स घाडगे ट्रेडर्सचे मालक धनंजय घाडगे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वीही याच प्रकरणात मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनलचे मालक मोहम्मद सलीम खान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य आयुक्त सचिन धोडरे यांनी सहायक आयुक्त दिपक शिरगुरवार व संतोष हेमने व कर्मचारी यांनी केली. वर्षभरात महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाने करचोरी करणाऱ्या ३१जणांना अटक केली.