नागपूर : एक व्यापारी सायबर गुन्हेगारांच्या ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात फसला व त्यानंतर त्याच्या मित्रानेच ‘न्यूड व्हिडिओ व्हायरल’करण्याची धमकी देत २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासातून आरोपीने आपल्या नातेवाईक तरुणीकडून त्याला खंडणी मागितल्याची बाब समोर आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

संबंधित व्यक्ती लग्नासाठी मुलगी शोधत होता व त्याने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथून त्याला मार्च २०२२ मध्ये सोनम नावाच्या मुलीचा फोन आला. तिने लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली व त्याला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने त्याला ‘व्हिडिओ कॉल’करायला लावला व स्वत: कपडे काढत त्यालादेखील कपडे काढायला भाग पाडले. या प्रकाराचा व्हिडिओ तिने तयार केला आणि त्याला व्हॉट्सॲपवर पाठविला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. युवकाने सायबर पोलीस ठाणे गाठले व त्यांच्या सूचनेनुसार ‘व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक’ केला. त्यानंतर कुठलाही फोन किंवा मेसेज आला नव्हता. मात्र, सप्टेंबर महिन्यात एका क्रमांकावरून ‘मिस कॉल’ आला व त्यावर ‘सोनम’चे नाव लिहिले होते. त्याने फोन करत विचारणा केली असता सोनमने पूर्वीचाच आक्षेपार्ह व्हिडिओ पुन्हा पाठविला.

हे ही वाचा…बाळ जन्मल्यानंतर रडले नाही… हे आहे गंभीर कारण… बालरोग तज्ज्ञ म्हणतात…

या प्रकाराची माहिती पीडित युवकाने अनिरुद्ध मोतीराम डहाके (३९, इमामवाडा) या मित्राला दिली. अनिरुद्धने फोन ‘हॅक’ झाला असण्याची शक्यता व्यक्त करत फोन स्वत:जवळ ठेवला. त्यानंतर पीडित व्यक्तीने परत ‘व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल’ केले होते. मात्र, अनिरुद्धच्या मोबाइलवर त्याने ‘व्हॉट्सॲप’ सुरू केले. समोरील व्यक्ती २५ लाखांची मागणी करत असल्याचे अनिरुद्धने व्यापाऱ्याला सांगितले. जर पैसे दिले नाही तर कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व नातेवाइकांना व्हिडिओ पाठविण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले.

मित्रानेच दिली धमकी

ती तरुणी पैसे मागत असल्याचे सांगताच पीडित व्यक्तीला संशय आला व त्याने मी पोलिसांत तक्रार केली असल्याचे त्याला सांगितले. यावरून अनिरुद्ध अस्वस्थ झाला व तुझी बदनामी होईल, असे म्हणाला. त्याच रात्री अनिरुद्धने त्याला भेटायला तुकडोजी चौकात बोलविले. ‘तू तक्रार मागे घे, नाही तर तुझा व्हिडिओ मीच तुझ्या नातेवाइकांना पाठवतो,‘ असे म्हणत त्याने जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. त्यानंतर त्याने ‘मी स्वत: आत्महत्या करून घेईल व तुला तसेच तुझ्या मित्रांना फसवील,’अशी भीतीदेखील दाखविली

हे ही वाचा…१५०० रुपयांच्या योजनेसाठी २०० कोटीचा जाहिरात खर्च, काँग्रेसचा आरोप

तरुणी निघाली नातेवाईक

पीडित व्यक्तीने दोन दिवसांनी अजनी पोलिस ठाण्यात संबंधित क्रमांकाच्या मालकाविरोधात तक्रार केली. तो क्रमांक एका महिलेचा निघाला. त्या महिलेची चौकशी केली असता ते सीम हरवल्याचे तिने सांगितले. चौकशीदरम्यान ती अनिरुद्धची नातेवाईक असल्याची बाब समोर आली. अखेर पीडित व्यक्तीने अनिरुद्धविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.